Join us  

जॅक मा बनले आशियातील सर्वात धनाढ्य व्यक्ती; मुकेश अंबानींची संपत्ती घटली 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 5:20 AM

मुकेश अंबानी आले दुसऱ्या स्थानावर : शेअर बाजारातील रिलायन्सच्या घसरणीचा फटका

नवी दिल्ली : सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कमी झालेले खनिज तेलाचे दर आणि त्याचा परिणाम म्हणून घसरलेला शेअर बाजार यामुळे रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांची संपत्ती कमी झाली. त्यामुळे आशियातील सर्वात धनाढ्य व्यक्तीची जागा त्यांनी गमावली आहे. या जागेवर आता अलिबाबा ग्रुपचे जॅक मा आले आहेत.

कोरोना व्हायरसच्या जगभरातील प्रसारामुळे जागतिक अर्थव्यवस्था मंदीमध्ये आल्याची भीती व्यक्त होत आहे. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचे दर खूपच कमी झाले. यामुळे शेअर बाजारातही मोठी घसरण झाली. याचा फटका रिलायन्सच्या समभागांना बसून त्याची किंमत बरीच कमी झाली.

जगातील खनिज तेलाची मागणी कमी होत असताना सौदी अरेबिया आणि रशियाने उत्पादनवाढीचा निर्णय घेतल्याने खनिज तेलाचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले. त्यामुळेच भारतातील खनिज तेल उत्पादनातील अव्वल कंपनी असलेल्या रिलायन्सचे शेअर बाजारातील दर खाली आले. त्याचा परिणाम कंपनीचे बाजार भांडवल मूल्य कमी होऊन मुकेश अंबानी यांची मालमत्ता घटली. सन २०२१ पर्यंत रिलायन्सला कर्जमुक्त करण्याची घोषणा अंबानी यांनी केली होती. अलिबाबा ग्रुप होल्डिंग लिमिटेड या जॅक मा यांच्या कंपनीलाही कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा फटका बसला आहे. मात्र या कंपनीने क्लाउड कॉम्प्युटिंग सर्व्हिसेस आणि मोबाइल अ‍ॅपचा वापर करीत आपला व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न सुरू ठेवल्याने त्यांचा तोटा काही प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळेच जॅक मा यांची मालमत्ता कमी होऊनही आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनता आले.ओएनजीसीचे बाजार भांडवल एक ट्रिलियनपेक्षा कमीमुंबई : सरकारी मालकीच्या ओएनजीसी या कंपनीचे बाजार भांडवल मूल्य १५ वर्षांत प्रथमच एक ट्रिलियन रुपयांच्या खाली आले आहे. गेल्या दोन महिन्यात या आस्थापनेचे समभाग ३७ टक्क्यांनी घसरले. त्यामुळे आस्थापनेचे बाजार भांडवल मूल्य ९८,८१८ कोटी रुपये झाल्याचे शेअर बाजाराने जाहीर केले आहे.शेअर बाजारातील या घसरणीमुळे मुकेश अंबानी यांची मालमत्ता ५.८ अब्ज डॉलरने कमी झाली. त्यामुळे त्यांचे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून असलेले स्थान गेले. त्यांच्या जागी आता अलिबाबा ग्रुपचे संस्थापक जॅक मा यांची वर्णी लागली आहे.ब्ल्युमबर्ग बिलिओनेअर इंडेक्सने ही माहिती प्रसारित केली आहे. जॅक मा यांची मालमत्ता ४४.५ अब्ज डॉलरएवढी असून, ती अंबानी यांच्यापेक्षा २.६ अब्ज डॉलरने जास्त आहे. मुकेश अंबानी आता दुसºया स्थानावर घसरले आहेत.

टॅग्स :मुकेश अंबानी