नवी दिल्ली : सरकार गतीने निर्णय घेत नसल्यामुळे भारतात परकीय कंपन्यांना व्यवसाय करणे अवघड आहे, असे मत ब्रिटनच्या वोडाफोनने व्यक्त केले आहे. वोडाफोन ही जगात दूरसंचार क्षेत्रात दुसऱ्या स्थानावर असून भारतात तिच्याविरुद्ध ११,२०० कोटी रुपयांच्या कर दायित्वाचे मोठे प्रकरण सुरू आहे. येथे आयोजित इकॉनॉमिस्ट इंडिया समीटमध्ये बोलताना वोडाफोन इंडियाचे प्रमुख मार्टिन पीटर्स यांनी ही खंत व्यक्त केली.ते पुढे म्हणाले की, भारतात आम्ही वायूलहरी विकत घेण्यासाठी आमच्या मूळ कंपनीकडून भांडवल आणण्यासाठी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये परवानगी मागितली होती. ती अजून मिळालेली नाही. भारतात व्यवसाय करणे हे खरोखरच अवघड काम आहे हा अनुभव केवळ दूरसंचार कंपन्यांनाच येतोय, असे नाही तर तो विदेशी कंपन्यांचाही आहे, असे पीटर्स म्हणाले. ...तर व्यवसाय करणे सोयीचेकाही गोष्टी दूर केल्या तर भारतात व्यवसाय करणे अधिक सोपे व अधिक सहज होऊ शकते, असेही ते म्हणाले. २०१५ च्या फेब्रुवारी महिन्यात स्पेक्ट्रमचा लिलाव होणार आहे. त्यासाठी इक्विटी उभ्या करण्याबाबत बोलताना पीटर्स म्हणाले की, त्याचे माझ्याकडे उत्तर नाही. त्या फाईलचे काम ज्या अधिकाऱ्याकडे होते ते आता निवृत्त झाले आहेत. जेवढी जास्त स्पर्धा तेवढे चांगले या विचारांमुळे भारतात दूरसंचार उद्योगबाबत गोंधळ निर्माण झाला आहे, असे त्यांनी सांगितले. औद्योगिक रचना कशी असावी ही सरकारची जबाबदारी आहे आणि तिच्यात बदल करण्यासाठी मला तरी फार काही दिसत नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
भारतात विदेशी कंपन्यांना व्यवसाय करणे कठीण
By admin | Updated: September 12, 2014 00:04 IST