नवी दिल्ली : शेअर बाजारात विदेशी गुंतवणुकीचा जबरदस्त प्रवाह यंदा कायम राहणे कठीण आहे, असे उद्योग मंडळ असोचेमने म्हटले आहे. येत्या काही महिन्यांमध्ये भारतीय बाजाराकडील कल फारसा उत्साही नसल्यामुळे विदेशी गुंतवणूक संस्थांच्या (एफआयआय) पुढाकाराने विदेशी गुंतवणूक फारशी नसेल.असोचेमचे म्हणणे असे आहे की या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी खासकरून पायाभूत सुविधांच्या व वस्तू उत्पादन क्षेत्रात विदेशी गुंतवणूक आकर्षित झाली पाहिजे.आर्थिक वर्ष २०१४-२०१५ मध्ये एकूण विदेशी गुंतवणूक जवळपास १८० टक्क्यांनी वाढून ७३.६ अब्ज डॉलरची झाली. याचे नेतृत्व एफआयआयने केले होते. केंद्रात पूर्ण बहुमताचे सरकार आल्यानंतर एफआयआयमध्ये खूप उत्साह निर्माण झाला होता. एफआयआयने आर्थिक वर्ष २०१४-२०१५ मध्ये ४०.९ अब्ज डॉलर टाकले व प्रत्यक्षात थेट विदेशी गुंतवणूक ३२.६ अब्ज डॉलरची होती. आता अशा प्रकारची गुंतवणूक होताना दिसत नाही. असोचेमने म्हटले आहे की चालू आर्थिक वर्षात थेट विदेशी गुंतवणुकीचा प्रवाह वाढत असला तरी विदेशी संस्थात्मक गुंतवणूक कमी होऊ शकते.किमान येत्या दोन तिमाहींमध्ये तरी विदेशी संस्थात्मक गुंतवणूक भारतात होण्याचे कोणतेही महत्त्वाचे कारण दिसत नाही. मंदावलेले बाजार, डॉलरची वाढती किंमत व अमेरिकेत अपेक्षेपेक्षा आधीच व्याजदरात वाढीच्या शक्यतेमुळे भारतात विदेशी संस्थात्मक गुंतवणूक कमी होऊ शकते, असे असोचेमचे म्हणणे आहे. कमी विदेशी गुंतवणुकीच्या शक्यतेबरोबरच वस्तूंची निर्यातदेखील सकारात्मक दिसत नाही. वस्तूंची निर्यात यावर्षी फारसा फेरबदल न होता ३१० अब्ज डॉलरच्या जवळपास असेल. २०१४-२०१५ मध्येही ती एवढीच झाली होती. असोचेमचे महासचिव डी. एस. रावत यांनी म्हटले आहे की, या परिस्थितीत बाह्य क्षेत्रही चालू आर्थिक वर्षात फारसे चांगले दिसत नाही. आयात कमी होण्याची चांगली शक्यता दिसत असून त्यामुळे रुपयावर डॉलरच्या तुलनेत दडपण असेल.
विदेशी गुंतवणुकीचा जोर कायम राहणे कठीण
By admin | Updated: June 15, 2015 00:50 IST