Join us  

प्रसिद्ध उद्योजक सिंघानिया पिता-पुत्रामधील दुरावा खरंच मिटला का? विजयपत सिंघानिया म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 10:33 AM

Raymond Gautam Singhania & Vijaypat Singhania: काही दिवसांपूर्वी सिंघानिया पिता-पुत्रांमधील वाद आणि दुरावा मिटल्याची माहिती समोर आली होती. परंतु विजयपत सिंघानिया यांनी यावर आता मोठं वक्तव्य केलंय.

Raymond Gautam Singhania & Vijaypat Singhania: रेमंड (Raymond) या प्रसिद्ध उद्योग समुहाचे मालक असलेल्या सिंघानिया कुटुंबातील वाद मागच्या काही वर्षांमध्ये चर्चेचा विषय ठरले होते. रेमंड समूहाचे एमडी गौतम सिंघानिया (Gautam Singhania) यांनी वडील विजयपत सिंघानिया (Vijaypat Singhania) यांना उद्योग समूहासह घरातून बाहेर काढल्यानं त्यांच्यावर टीका झाली होती. या घटनेनंतर विजयपत सिंहानिया हे भाड्याच्या घरात राहत होते. दरम्यान, सिंघानिया पिता-पुत्रांमधील वाद आणि दुरावा मिटल्याची माहिती समोर आली होती.  

दरम्यान, आता विजयपत सिंघानिया यांनी यावर मोठं वक्तव्य केलंय. आपल्यात सलोखा झाला नसल्याचं त्यांनी सांगितलं. २० मार्च रोजी विमानतळावर जात असताना त्यांना त्यांच्या मुलाच्या असिस्टंटचा फोन आल्याचं विजयपत सिंघानिया यांनी म्हटलं. 

काय म्हणाले सिंघानिया? 

"गौतम सिंघानियांचा असिस्टंट मला घरी येण्यासाठी सातत्यानं विनंती करत प्रयत्न करत होता. जेव्हा मी त्याला नकार दिला तेव्हा गौतम यांनी स्वत: संपर्क केला आणि केवळ कॉफीसह माझी फक्त ५ मिनिटांची वेळ घेईल असं सांगितलं," असं विजयपत सिघानिया इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले. 

"इच्छा नसतानाही मी तिकडे गेलो. गौतम सिंघानियांसोबत माझा फोटो काढून मीडियाला एक मजबूत संदेत पाठवण्याचा हेतू होता हे मला समजलं नाही. काही मिनिटांनंतर मी खाली आलो आणि विमानतळाकडे निघालो. यानंतर लगेचच गौतम यांच्यासोबतच्या फोटोचे मेसेज मिळाले. यामध्ये आमच्यातील वाद मिटल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

 

काय म्हणालेले गौतम सिंघानिया? 

आज माझे वडील माझ्या घरी आले आहेत, त्यामुळे मी आनंदी आहे. त्यांचे आशीर्वाद घेत आहे. बाबा तुम्हाला चांगल्या आरोग्यासाठी खूप शुभेच्छा, असं गौतम सिंघानिया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सद्वारे केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं. 

विजयपत सिंघानिया यांनी काही वर्षांपूर्वी रेमंड कंपनीचं नेतृत्व आणि हजारो कोटींचे शेअर मुलगा गौतम सिंघानिया यांच्या नावावर केले होते. त्यानंतर सिंघानिया पिता-पुत्रांमध्ये वाद झाला होता. त्याची परिणती विजयपत सिंघानिया यांच्या बेघर होण्यात झाली होती. त्यानंतर विजयपत सिंघानिया यांनी आपण घेतलेल्या निर्णयाबाबत खंत व्यक्त केली होती. 

टॅग्स :व्यवसायरेमंड