Join us

गुंतवणूकदारांचा मोर्चा ईएलएसए योजनांकडे

By admin | Updated: August 18, 2014 02:37 IST

उपलब्ध माहितीनुसार, गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा जुलैमध्ये झालेल्या गुंतवणुकीत ५१ टक्के वाढ नोंदली गेली आहे.

मुंबई - केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पाद्वारे प्राप्तिकर कलम कायदा ८० सीसीच्या मर्यादेत वाढ करत ही मर्यादा दीड लाखांनी वाढविल्याच्या पार्श्वभूमीवर इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीमकडे गुंतवणूकदारांनी मोर्चा वळविला असून एकट्या जुलै महिन्यात या योजनांत ४७२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार, गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा जुलैमध्ये झालेल्या गुंतवणुकीत ५१ टक्के वाढ नोंदली गेली आहे. गेल्या आर्थिक वर्षात त्या अगोदरच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २७ टक्के वाढ नोंदली गेली होती आणि २०१३-१४ या वर्षात एकूण ईएलएसएस योजनांत ७७३ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. त्या तुलनेत यंदा एकट्या जुलै महिन्यात ४७२ कोटी रुपयांची गुंतवणूक वाढल्याने, गुंतवणूकदार या योजनांना प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे. सुरक्षित मानल्या जाणाऱ्या म्युच्युअल फंड योजनांना अनेक गुंतवणूकदार पसंती देतात. मात्र, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना कर बचतीचे कवचही मिळावे, याकरिता म्युच्युअल फंड कंपन्यांनी कर बचत देणाऱ्या योजना सादर केल्या. इक्विटी योजनांच्या तुलनेत या योजनांत जोखीम अत्यंत कमी असल्याने या योजनांतून मिळणारा परतावाही इक्विटी योजनांच्या तुलनेत कमी आहे. मात्र, बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या अन्य फिक्स्ड इन्कम योजना, त्यावर मिळणारा परतावा आणि त्यातील गुंतवणुकीचा कालावधी या तुलनेत कर बचतीचे कवच असलेल्या म्युच्युअल फंड योजनांना गुंतवणूकदार पसंती देतात. (प्रतिनिधी)