Join us

म्युच्युअल फंडांची शेअरमध्ये ७,६०० कोटींची गुंतवणूक

By admin | Updated: May 6, 2015 22:27 IST

म्युच्युअल फंड व्यवस्थापकांनी एप्रिल महिन्यात शेअरमध्ये ७,६०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून हा सात वर्षानंतरचा सर्वात मोठा आकडा आहे.

नवी दिल्ली : म्युच्युअल फंड व्यवस्थापकांनी एप्रिल महिन्यात शेअरमध्ये ७,६०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून हा सात वर्षानंतरचा सर्वात मोठा आकडा आहे. गुंतवणूकदारांची सकारात्मक भावना व सरकारच्या सुधारणा कार्यक्रमामुळे ही गुंतवणूक होऊ शकली. एप्रिल २०१४मध्ये म्युच्युअल फंडांनी शेअर बाजारांतून २,६८९ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली होती. सेबीच्या ताज्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये म्युच्युअल फंडांनी शेअरमध्ये ७,६१८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. जानेवारी २००८नंतर एका महिन्यात शेअरमध्ये झालेली ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. तेव्हा म्युच्युअल फंडांनी शेअरमध्ये ७,७०३ कोटी रुपये गुंतवले होते. याशिवाय फंड व्यवस्थापकांनी गेल्या महिन्यात कर्ज बाजारात २८ हजार ६५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणूकदारांची सकारात्मक भावना, सरकारचा सुधारणा अजेंडा, घरगुती अर्थव्यवस्थेत सुधारणा आणि किरकोळ गुंतवणूकदारांची भागीदारी वाढल्यामुळे शेअर बाजारांत म्युच्युअल फंडाची गुंतवणूक वाढली आहे. दरम्यान, असोसिएशन आॅफ म्युच्युअल फंडस् इन इंडियातर्फे वितरकांना देण्यात येणाऱ्या अग्रिम कमिशनची मर्यादा एक टक्का ठेवल्याचा या क्षेत्राला फटका बसू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.