Join us

इंटेल करणार १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2016 03:43 IST

जगातील सर्वात मोठी मायक्रोप्रोसेसर उत्पादक कंपनी इंटेलने अंतर्गत पुनर्रचनेची मोठी मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार आहे

ह्युस्टन : जगातील सर्वात मोठी मायक्रोप्रोसेसर उत्पादक कंपनी इंटेलने अंतर्गत पुनर्रचनेची मोठी मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार आहे. कंपनीच्या या निर्णयाने आयटी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.पर्सनल कॉम्प्युटर बाजारावरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न म्हणून ही कर्मचारी कपात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या क्षेत्रात वाढीची गती धीमी झाली आहे. इंटेलमध्ये गेल्या वर्षीच्या अखेरीस १,0७,३00 कर्मचारी होते. नियोजित कार्यक्रमानुसार, २0१७ पर्यंत इंटेल ११ टक्के कर्मचाऱ्यांना घरी पाठविणार आहे. ही प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येणार आहे. ज्यांना काढण्यात येणार आहे, त्या कर्मचाऱ्यांना आगामी ६0 दिवसांत त्यासंबंधीची नोटीस देण्यात येणार आहे. अनेक वर्षांपूर्वी इंटेलने पर्सनल कॉम्प्युटर क्षेत्रावर मोठा डाव लावला होता. या व्यवसायात स्थिरता असल्यामुळे कंपनीचा लाभही झाला. कंपनी मायक्रोप्रोसेसर निर्मितीत जगात आघाडीवर राहिली. तथापि, आता या क्षेत्राची वाढ मंदावली आहे. आता मोबाईल बाजार सर्वाधिक तेजीत आहे. डेस्कटॉप आणि लॅपटॉपची जागा आता मोबाईलने घेतली आहे. इंटेलने मोबाईल बाजारातही धडक देण्याचा प्रयत्न केला. तथापि, कंपनीची मोबाईल उपकरणे तेवढी यशस्वी झाली नाहीत. त्यामुळे कंपनीच्या एकूण महसुलावर मोठा परिणाम झाला आहे. इंटेलचा ६0 टक्के महसूल मायक्रोप्रोसेसर आणि चीप व्यवसायातून येतो. त्यामुळे पर्सनल कॉम्प्युटर व्यवसायातील फेरबदलाचा थेट परिणाम कंपनीच्या व्यवसायावर होतो.