Join us

क्लेम नाकारल्याबद्दल विमा कंपनीला दंड

By admin | Updated: May 9, 2015 00:20 IST

सर्पदंशाने महिला शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला व्यक्तिगत अपघात विमा योजनेची रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या न्यू इंडिया इन्शुरन्स

भंडारा : सर्पदंशाने महिला शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला व्यक्तिगत अपघात विमा योजनेची रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या मुंबई शाखेला ग्राहक मंचने दंड ठोठावला आहे.शारदा मारुती निंबेकर, रा. सेंदूरवाफा, ता.साकोली यांना शेतात काम करीत असताना विषारी सापाने चावा घेतला. त्यांना साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत महिलेच्या कुटुंबियांनी शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा दावा दाखल केला; मात्र कंपनीने व्हिसेरा अहवालाअभावी विमा दावा खारीज केला. सर्पदंशाने महिला शेतकऱ्याचा मृत्यू होऊनही विमा रक्कम देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचे समजताच निंबेकर कुटुंबियांनी ग्राहक मंचकडे धाव घेतली. मंचने कंपनीच्या मुंबई शाखेला नोटीस पाठविली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कंपनीने मृत महिलेच्या कुटुंबियांना अपघात विमा योजनेचे एक लाख रुपये व्याजासह ११ फेब्रुवारी २०११ पासून द्यावेत, त्रासापोटी पाच हजार रुपये व तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रुपये द्यावेत, असा आदेश दिला. तक्रारकर्त्यांकडून अ‍ॅड. एस. एस. चन्ने यांनी काम पाहिले.