Join us
Daily Top 2Weekly Top 5

८४ हजार वीज कर्मचा-यांना विमा कवच

By admin | Updated: December 26, 2014 01:16 IST

वीज मंडळाच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच तीनही कंपन्यांमधील तमाम वीज कर्मचाऱ्यांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे तीन लाख रुपयांचे विमा

राजेश निस्ताने, यवतमाळ वीज मंडळाच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच तीनही कंपन्यांमधील तमाम वीज कर्मचाऱ्यांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे तीन लाख रुपयांचे विमा सुरक्षा कवच प्रदान करण्यात आले आहे. वीज कंपनी आणि कर्मचारी संघटनांनी २३ डिसेंबर रोजी या संबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. वीज क्षेत्रातील धोका वाढला आहे. दरवर्षी सुमारे २०० कर्मचारी वेगवेगळ्या कारणांनी बळी जातात. त्यात विद्युत शॉक लागून आणि वीज खांबावरून पडल्याने मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे. हा वाढता धोका लक्षात घेऊनच वीज कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्याची मागणी गेली कित्येक वर्षे केली जात आहे. अखेर सन २०१४ ला ही मागणी पूर्ण झाली. राज्यातील वीज निर्मिती, पारेषण व वितरण या तीनही कंपन्यांमधील ८४ हजार १९६ वीज कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. अभियंते, अधिकारी ते वीज सहायकापर्यंत सर्वांनाच यात समाविष्ट केले गेले आहे. ‘एमएसईबी एचसीएल ग्रुप मेडिकल पॉलिसी’ या नावाने हा विमा राहणार असून १ जानेवारी २०१५ पासून तो लागू होत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनीने यावर्षीचा २० कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला आहे. एका कर्मचाऱ्यामागे सरासरी साडेचार हजार रुपये भरले गेले आहेत. १३ आॅगस्ट २०१४ रोजी खुल्या टेंडरद्वारे केंद्र शासनाच्या अखत्यारीतील चारही कंपन्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यात ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीची निविदा कमी दराची असल्याने त्यासोबत वीज व्यवस्थापनाने वाटाघाटी केल्या. मंगळवार २३ डिसेंबरला कराराद्वारे या विमा संरक्षणावर शिक्कामोर्तब केले गेले. विम्याच्या हप्त्यापोटी २० कोटी रुपये भरले जाणार आहेत. २६ जून २०१४ रोजी वेतनवाढीचा करार करताना त्यातील २० कोटींची रक्कम विम्यासाठी आधीच सुरक्षित ठेवण्यात आली होती. वीज कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्याची एमएसईबी वर्कर्स फेडरेशनची सर्वात जुनी मागणी आहे. त्या अनुषंगाने फेडरेशनने सतत पाठपुरावाही केला. अखेर या लढ्याला यश आले. फेडरेशनच्या पुढाकारानेच अन्य संघटना कराराला तयार झाल्या, असे एमएसईबी वर्कर्स फेडरेशनचे उपमहासचिव कृष्णा भोयर यांनी सांगितले.