Join us

मुश्रीफांची मुरगूड ग्रामीण रुग्णालयाला भेट वैद्यकीय अधिकार्‍यांना दिल्या सूचना; रुग्णांची केली विचारपूस

By admin | Updated: November 22, 2014 23:30 IST

मुरगूड : मुरगूड परिसरातील दहा ते पंधरा गावांमध्ये गेल्या महिन्यापासून गॅस्ट्रोची साथ सुरू आहे. मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात शेकडो रुग्णांवर उपचार झाले आहेत. याबाबत माहिती घेण्यासाठी माजी जलसंपदामंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी रुग्णालयाला भेट दिली. दाखल रुग्णांची विचारपूस करून वैद्यकीय अधिकार्‍यांना सूचना देऊन गॅस्ट्रोची साथ आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.

हळदवडे, हळदी, शिंदेवाडी, यमगे, मळगे बु।, सुरूपली, निढोरी, बिरवडे, सावर्डे, ठाणेवाडी, बोळावी, चिमगाव, दौलतवाडी, आदी गावांमध्ये गेल्या महिन्याभरात गॅस्ट्रोसदृश्य साथीचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत होते. इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असून आणि युद्ध पातळीवर उपचार उपाय योजना करूनही साथ आटोक्यात येत नसल्याने मुश्रीफांसह, मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, नगराध्यक्षा माया चौगले, उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांच्यासह अन्य नगरसेवकांनी रुग्णालयला भेट दिली.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. बी. थोरात यांच्याकडून सविस्तर माहिती घेत रुग्णालयाने दाखल झालेल्या रुग्णांवर कसे उपचार केले. तसेच साथ पसरण्याचे नेमके कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणचे पाणी वरील गावांना मिळत असताना या गावांमध्ये साथ कशी पसरली याचा प्रथमत: शोध घ्या. गावा-गावांचे सर्वेक्षण, लोकांमध्ये जागृती निर्माण, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे प्रबोधन करून, बाधित गावांतील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासून वैद्यकीय अधिकार्‍यांनी पाहणी करावी, अशा सक्त सूचना दिल्या.
-------------------
चौकट :
आज पुन्हा १५ रुग्ण दाखल
आज दिवसभरामध्ये ग्रामीण रुग्णालयात पाच रुग्ण, तर शहरातील अन्य खासगी रुग्णालयात दहा रुग्ण दाखल झाले. बाधित गावातील ग्रामपंचायतीच्या पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू असून, स्वच्छता मोहीम, पाण्याचे नमुने, घरोघरी जाऊन सर्वेक्षण, असे अनेक उपक्रम राबविले जात आहेत.
-----------------
फोटो ओळ :
मुरगूड (ता. कागल) येथील ग्रामीण रुग्णालयात परिसरातून दाखल झालेल्या गॅस्ट्रोच्या रुग्णांची विचारपूस करताना हसन मुश्रीफ, प्रवीणसिंह पाटील, माया चौगले, दगडू शेणवी, आदी.