Join us

सत्कारासाठी पुप्षगुच्छाऐवजी ‘ट्री सर्टिफिकेट’

By admin | Updated: May 1, 2015 10:17 IST

झाडे लावा - झाडे जगवा यासारख्या केवळ घोषणा न देता प्रत्यक्ष पर्यावरण संवर्धनाच्या मोहिमेत सक्रिय भाग घेण्याच्या दृष्टीने भारतीय रिझर्व्ह बँकेने एक अनोखा निर्णय घेतला आहे.

मनोज गडनीस - मुंबईझाडे लावा - झाडे जगवा यासारख्या केवळ घोषणा न देता प्रत्यक्ष पर्यावरण संवर्धनाच्या मोहिमेत सक्रिय भाग घेण्याच्या दृष्टीने भारतीय रिझर्व्ह बँकेने एक अनोखा निर्णय घेतला असून, यापुढे बँकेच्या कोणत्याही कार्यक्रमात कोणाचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात येणार नाही तर, त्याऐवजी सत्कारमूर्तींना त्यांच्याकरिता झाडे लावण्यात आल्याचे प्रमाणपत्र (ट्री सर्टिर्फिकेट) देऊन गौरविण्यात येणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी बँकेने विविध शाखांतील कर्मचाऱ्यांसाठी पत्रक प्रसिद्ध केले असून, यानुसार एखाद्या कर्मचाऱ्याच्या वाढदिवसापासून ते निवृत्ती अथवा अन्य कोणत्याही कार्यक्रमात अथवा बैठकीदरम्यान पुष्पगुच्छ देण्याचा वापर बंद करावा, असे सूचित केले असून त्याऐवजी झाडे लावून त्याचे प्रमाणपत्र तयार करून त्या व्यक्तीला भेट देण्यास सांगितले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी बँकेने एक निश्चित कार्यक्रमही हाती घेतला. प्रत्येक विभागीय कार्यालयाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करून दिले आहे. वित्तीय वर्षात कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार २०० ते एक हजार झाडांची लागवड करण्याचे सूचित केले आहे. चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, बंगलोर आदी मोठ्या कार्यालयांना एक हजार झाडांची लागवड करण्याचे सूचित केले. एक एप्रिलपासून याची अंमलबजावणी झाली आहे. प्रत्येक वित्तीय वर्षाच्या अखेरीस लागवडीचा आणि प्रमाणपत्रांचा आढावा घेतला जाणार आहे.च्भारतामध्ये आजच्या घडीला ५० पेक्षा जास्त मोठ्या संस्था वृक्ष लागवडीचे काम करतात आणि त्यांच्यातर्फे ही वृक्ष लागवडीची प्रमाणपत्रे जारी करण्यात येतात. या संस्थांना वेबसाईट, हेल्पलाइन अथवा प्रत्यक्ष त्यांच्या कार्यालयात जाऊन संपर्क साधता येतो आणि किमान ४० रुपयांपासून अगदी ८०० रुपयांपर्यंत पैसे भरून झाडे लावण्याची आॅर्डर देत प्रमाणपत्र मिळविता येते.