Join us

‘कोट्यधीश’ शेतकऱ्यांची ‘आयकर’कडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 21:05 IST

गेल्या नऊ आर्थिक वर्षांत २७०० पेक्षा जास्त लोकांनी त्यांचे कृषी उत्पन्न एक कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे जाहीर केले आहे. त्यापैकी काही ‘निवडक’ प्रकरणांची प्राप्तीकर विभाग

नवी दिल्ली : गेल्या नऊ आर्थिक वर्षांत २७०० पेक्षा जास्त लोकांनी त्यांचे कृषी उत्पन्न एक कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे जाहीर केले आहे. त्यापैकी काही ‘निवडक’ प्रकरणांची प्राप्तीकर विभाग कर चुकविल्याच्या प्रकरणी चौकशी करीत आहे.प्राप्तीकर विभाग संपूर्ण देशभरातील कार्यालयामार्फत हा आढावा घेत आहे. विशेषत: २०११-१२ ते २०१३-१४ या दरम्यान ज्यांनी एक कोटी रुपयांपेक्षा जास्त कृषी उत्पन्न असल्याचे जाहीर केले आहे त्यांच्या ‘उत्पन्ना’ची ‘पडताळणी’ करून पाहा, असे विभागाने आपल्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. काही जण आपला बेहिशेबी पैसा लपविण्यासाठी तो पैसा आपले कृषी उत्पन्न असल्याचे दाखवीत आहेत. याबद्दल चिंता व्यक्त करणारी एक जनहित याचिका पाटणा उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्राप्तीकर विभागाने अशी चौकशी सुरू केली आहे. भारतात कृषी उत्पन्नाला कर लागत नाही. त्यामुळेच काही जण ‘कृषी उत्पन्न’ दाखवून कर चुकवीत आहेत.गेल्या ९ आर्थिक वर्षांत २७४६ जणांनी आपले कृषी उत्पन्न एक कोटींपेक्षा जास्त असल्याचे दाखविले आहे. २००७-०८ ते २०१५-१६ या काळातील ही आकडेवारी आहे; मात्र चौकशी २०११-१२ ते २०१३-१४ या काळापुरतीच मर्यादित ठेवण्यात आली आहे. २०११-१२ ते २०१३-१४ या काळात काही प्रकरणांतच जास्त संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे या काळातील अशा प्रकरणांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.. याबाबतचा अहवाल २० मार्चपर्यंत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडे पाठविला जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)>कानपूर : काळा पैसा उघड केल्यानंतर त्यातील ७.५ टक्के रक्कम ‘शेतकरी कल्याण अधिभार’ म्हणून भरावी लागेल, असे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी सांगितले. ते म्हणाले की, अर्थसंकल्पात तशी तरतूद करण्यात आली असून हे काम पूर्वीच झाले असते तर शेतकऱ्यांची आजच्यासारखी स्थिती राहिली नसती.अशा प्रकारची सर्वात जास्त प्रकरणे बंगळुरूतून (३२१) उघड झाली आहेत. त्यापाठोपाठ दिल्ली (२७५), कोलकाता (२३९), मुंबई (२१२), पुणे (१९२), चेन्नई (१८१) आणि हैदराबाद (१६२) यांचा क्रमांक लागतो.