Join us

आतील पान - विश्लेषण - मस्ट

By admin | Updated: December 2, 2014 23:30 IST

सेना युद्धात जिंकली पण तहात हरली!

सेना युद्धात जिंकली पण तहात हरली!
संदीप प्रधान
मुंबई- विधानसभा निवडणुकीत 63 आमदार जिंकून भाजपाचा अश्वमेध रोखणार्‍या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अर्धे युद्ध जिंकले खरे, पण त्यानंतर सत्तेसाठी भाजपापुढे नांगी टाकत सपशेल हार पत्करली.
युवासेनेचे आदित्यच्या बालह?ापोटी भाजपसोबतची पंचवीस वर्षांची युती तोडून स्वबळावर निवडणुकीला सामोरे गेलेल्या शिवसेनेकडे सर्व जागांवर उमेदवारही मिळू शकले नाहीत. युती तुटल्यापासून उद्धव ठाकरे यांनी सतत परस्परविरोधी भूमिका घेत पक्षातच संभ्रम निर्माण केला. एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे करायचा आणि त्याचवेळी दुसरीकडे दोनेकशे उमेदवारांना बी फॉर्म वाटून टाकायचे. त्यामुळे ऐनवेळी मनसेचा हातही शिवसेनेला धरता आला नाही. निवडणूक प्रचारात भाजपावर विश्वासघाताची टीका केली, पण केंद्रातील अवजड उद्योग हे फुटकळ खाते सोडवले नाही.
परंतु तरीही 63 जागा जिंकून भाजपाला बहुमतापासून रोखले. शिवसेनेने मिळविलेले हे यश नि?ित कौतुकास्पद होते. पण पुन्हा उद्धव यांच्या धरसोड वृत्तीमुळे सत्ते पासून शिवसेना लांबच राहिली.
राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकून सरकार चालविण्यासाठी आता शिवसेनेची आम्हाला गरज उरलेली नाही, असा संदेश भाजपाने देऊन टाकला. आता विरोधीपक्षनेतेपदही हातून जाते की काय, म्हणून घाईघाईने त्यांनी ते पद पदरात पाडून घेतले. एकदा विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यावर ठाम राहाण्याऐवजी उद्धव यांनी वाटाघाटीसाठी ‘वर्षा’चे दार पुन्हा-पुन्हा ठोठावले. तिथेही पुन्हा तोच धरसोडपणा दाखवला. एकिकडे सत्तेसाठी भाजपनेत्यांसोबत बंद दाराआड वाटाघाटी आणि दुसरीकडे दुष्काळी भागाच्या पाहाणी दौर्‍याच्या निमित्ताने सरकारवर टीका. उद्धव यांचे नेमकं चाललंय तरी काय, असा प्रo्न शिवसैनिकांनाही पडला होता.
भाजपासोबत वाटाघाटींचे गुर्‍हाळ सुरु झाले तेव्हा अखंड महाराष्ट्राचे वचन, जैतापूर प्रकल्पाला विरोध या आपल्या अटी असल्याचे उद्धव सांगत होते, पण प्रत्यक्षात मंत्रीपदे, खाती यावरच तडजोड करत होते. महाराष्ट्रातील नेत्यांसोबत चर्चा करणार नाही, असे उच्चरवात सांगणार्‍या उद्धव यांनी शेवटी राज्यातील नेत्यांसोबतच चर्चेचा पट मांडला.
सत्तेसाठी आसुसलेल्या शिवसेनेचे पाणी भाजपाने पुरते जोखले होते. त्यामुळेच गेला महिनाभर चर्चेच्या फेर्‍यात त्यांना अडकवून ठेवले. यामुळे वाटाघाटी हा टिंगल-टवाळीचा विषय झाला, शिवसेनेची सत्तालालसा टीकेची लक्ष्य झाली.
केंद्रातील अवजड उद्योग खात्याचे मंत्रीपद सोडायचे नाही,महाराष्ट्रात विरोधी पक्षनेतेपद घेऊन भाजपावर टीका करायची आणि मध्यरात्री सत्ता सहभागाच्या वाटाघाटी करीत बसायचे अशी त्रिशंकु अवस्था उद्धव यांच्या धोरणांमुळे शिवसेनेची झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात जी शिवसेना रोखठोक भूमिकेकरिता ओळखली जायची तिची सत्तेमागील फरफट भाजपा नेतृत्वाने हेरली आणि आता शिवसेनेला लज्जारक्षणा पुरताच सत्तेचा वाटा दिला. स्वाभिमानाच्या गमजा मारणार्‍या शिवसेनेच्या हाती चणे-फुटाणे टाकून भाजपाने निवडणुकीनंतरचाही डाव जिंकला! (विशेष प्रतिनिधी)