Join us  

Infosys Narayana Murthy: आजोबांची कमाल, नातवाची धमाल; आधी मूर्तींचे २४० कोटींचे शेअर्स गिफ्ट, आता ४.२ कोटींचा डिविडंट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 2:06 PM

Infosys Narayana Murthy: यापूर्वी नारायण मूर्ती आपला नातू एकाग्रहला इन्फोसिसचे ०.०४ टक्के शेअर्स गिफ्ट केले होते. एकाग्रह हा अवघ्या सहा महिन्यांचा आहे.

Infosys Narayana Murthy: इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांच्या अवघ्या पाच महिन्यांच्या नातवाला म्हणजेच एकग्रह रोहन मूर्तीला ४.२ कोटी रुपये मिळणार आहेत. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसनं १८ एप्रिल रोजी फायनल डिविडंड आणि स्पेशल डिविडंड जाहीर केला होता. गेल्या महिन्यात नारायण मूर्ती यांनी एकग्रहला २४० कोटी रुपयांहून अधिक किमतीचे शेअर्स गिफ्ट केले होते. 

यासह, एकाग्रहनं भारतातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनीतील १५ लाख शेअर्स किंवा ०.०४% स्टेक मिळवले. एकूण २८ रुपयांच्या डिविडंडचा विचार केल्यास, एकग्रहला ४.२ कोटी रुपये मिळतील. कारण, आर्थिक वर्ष २०२४ च्या निकालांच्या घोषणेसह, इन्फोसिसच्या संचालक मंडळानं ३१ मार्च २०२४ रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी प्रति इक्विटी शेअर २० रुपये फायनल डिविडंड आणि ८ रुपये प्रति इक्विटी शेअर अतिरिक्त स्पेशल डिविडंड देण्याची शिफारस केली आहे. याची रेकॉर्ड डेट ३१ मे २०२४ आहे. १ जुलै २०२४ रोजी हा डिविडंड दिला जाईल. 

एकाग्रहला महिन्यात ३० कोटींचं नुकसान 

तथापि, एकग्रहच्या इन्फोसिसच्या शेअर्सचं एकूण मूल्य ३० कोटी रुपयांनी घसरलं आहे. भेट दिल्यानंतर आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल २०० रुपयांची घसरण झाली आहे. १९ एप्रिल रोजी सकाळी ११:१५ वाजता, इन्फोसिसचे शेअर्स १.२ टक्क्यांनी घसरून १४०२.४० रुपयांवर व्यवहार करत होते. 

एकाग्रहला इन्फोसिसमधील ०.०४ टक्के स्टेक मिळाला आहे. या करारानंतर मूर्ती यांची इन्फोसिसमधील भागीदारी ०.४० टक्क्यांवरून ०.३६ टक्क्यांवर आली. एकग्रहचा जन्म गेल्या वर्षी १० नोव्हेंबर रोजी झाला. तर दुसरीकडे नारायण मूर्ती यांच्या कन्या अक्षता मूर्ती यांना कृष्णा आणि अनुष्का नावाच्या दोन मुलीदेखील आहेत. डिसेंबर तिमाहीच्या अखेरिस, अक्षता यांच्याकडे इन्फोसिसमध्ये १.०५%, सुधा मूर्तींकडे ०.९३% आणि रोहन यांच्याकडे १.६४% हिस्सा होता.

टॅग्स :इन्फोसिसव्यवसाय