नवी दिल्ली : ठोकमूल्यावर आधारित महागाईचा दर सलग १७ व्या महिन्यात मार्चमध्ये शून्याच्या खाली आहे. विशेषत: डाळींसह खाद्य उत्पादनांच्या दरात तेजी असल्याने महागाई दर किंचित वाढून उणे (-) ०.८५ टक्के राहिला. ठोक मूल्यावर आधारित महागाई दर फेब्रुवारीत उणे (-) ०.९१ टक्के होता. मागील वर्षी मार्चमध्ये हा दर उणे (-) २.३३ टक्के होता. नोव्हेंबर २०१४ पासून महागाई दर शून्यापेक्षा खाली आहे. ठोक मूल्यांवर आधारित सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार मार्चमध्ये खाद्यवस्तूंच्या महागाईत वाढ होऊन ती ३.७३ टक्के झाली आहे. फेब्रुवारीत हा दर ३.३५ टक्के होता. मार्चमध्ये भाज्यांच्या ठोक दराचा निर्देशांक उणे (-) २.२६ टक्क्यांनी घटता राहिला, तर डाळींचे दर मात्र ३४.४५ टक्के इतके वाढलेले दिसून आले. याचदरम्यान कांदे आणि फळांच्या किमतीत घट दिसून आली. मार्चमध्ये इंधन आणि ऊर्जा क्षेत्रात महागाईच्या दरात उणे (-) ८.३० टक्के इतकी घट दिसून आली, तर निर्मिती क्षेत्रातील उत्पादनात महागाई दर मार्चमध्ये शून्याखाली म्हणजेच उणे (-) ०.१३ टक्के राहिला. रिझर्व्ह बँक आर्थिक धोरण आखताना प्रामुख्याने महागाई दरावर नजर ठेवून असते. किरकोळ महागाई दर मार्चमध्ये घटून ४.८३ टक्क्यांवर आला आहे. रिझर्व्ह बँकेने याच महिन्यात आपल्या व्याजदरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे, तर चालू आर्थिक वर्षात किरकोळ वस्तूंचा महागाई दर पाच टक्क्यांवर राहील, असा अंदाज वर्तविला आहे.
महागाई दर शून्याच्या खालीच
By admin | Updated: April 19, 2016 03:03 IST