Join us  

घाऊक महागाईचा चार महिन्यांचा उच्चांक, महागाई दर ३.२४ टक्क्यांवर : कांदे, भाजीपाल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:49 AM

घाऊक क्षेत्रातील महागाईचा दर आॅगस्टमध्ये वाढून ३.२४ टक्क्यांवर गेला असून, हा चार महिन्यांचा उच्चांक ठरला आहे. कांदे, भाजीपाला यासह खाद्यवस्तूंच्या किमतींत लक्षणीय वाढ झाल्यामुळे महागाई वाढली आहे. इंधन दरवाढीमुळे मालवाहतूक महागली असून, त्यामुळे भाजीपाल्याची प्रचंड दरवाढ झाली आहे.

नवी दिल्ली : घाऊक क्षेत्रातील महागाईचा दर आॅगस्टमध्ये वाढून ३.२४ टक्क्यांवर गेला असून, हा चार महिन्यांचा उच्चांक ठरला आहे. कांदे, भाजीपाला यासह खाद्यवस्तूंच्या किमतींत लक्षणीय वाढ झाल्यामुळे महागाई वाढली आहे. इंधन दरवाढीमुळे मालवाहतूक महागली असून, त्यामुळे भाजीपाल्याची प्रचंड दरवाढ झाली आहे.घाऊक किंमत निर्देशांकांवर आधारित महागाईचा दर जुलैमध्ये १.८८ टक्के होता. तसेच आॅगस्ट २०१६ मध्ये तो १.०९ टक्के होता. आॅगस्टमध्ये तो ३.२४ टक्के झाला. याआधीचा उच्चांकी दर एप्रिलमध्ये ३.८५ टक्के होता. केंद्र सरकारने आज जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आॅगस्टमध्ये वार्षिक आधारावर खाद्यवस्तूंच्या किमतींत ५.७५ टक्क्यांची वाढ झाली आहे. जुलैमध्ये ही वाढ २.१५ टक्के होती. आॅगस्टमध्ये भाजीपाल्याच्या किमती ४४.९१ टक्के वाढल्या. जुलैमध्ये त्या २१.९५ टक्के होत्या. कांद्याच्या किमतींत ८८.४६ टक्क्यांची वाढ झाली. जुलैमध्ये ती ९.५० टक्के होती. वस्तू उत्पादन क्षेत्रातील महागाई किंचित वाढून २.४५ टक्के झाली. जुलैमध्ये ती २.१८ टक्के होती. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील महागाईचा दर ९.९९ टक्के झाला. जुलैमध्ये तो ४.३७ टक्के होता.जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींत मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील महागाईचा दर भडकला आहे.किरकोळ महागाईही उच्चांकावरयाच आठवड्याच्या प्रारंभी किरकोळ क्षेत्रातील महागाईची आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार, किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दरही पाच महिन्यांच्या उच्चांकावर जाऊन ३.३६ टक्के झाला. किरकोळ क्षेत्रातही भाजीपाला आणि फळे यांच्या किमती वाढल्याचे दिसून आले.भाजीपाल्याप्रमाणेच फळे (७.३५ टक्के), अंडी, मांस आणि मासे (३.९३ टक्के), अन्नधान्ये (०.२१ टक्के) आणि भात (२.७० टक्के) या खाद्यवस्तूंच्या किमतींतही वाढ झाली आहे.बटाट्याच्या किमतींत मात्र ४३.८२ टक्के संकोच (डिप्लेशन) झाला आहे. डाळींच्या किमतीही उणे (-) ३०.१६ टक्क्यांचा संकोच दर्शवित आहेत. जूनमधील महागाईची अंतिम आकडेवारीही सरकारने आज जारी केली. ती ०.९० टक्के इतकी स्थिर राहिली.

टॅग्स :भारत