नवी दिल्ली : इंधन आणि अन्नपदार्थ स्वस्त झाल्याने ठोक मूल्यांक निर्देशांक आधारित महागाईचा दर ऑक्टोबरमध्ये पाच वर्षातील नीचांक गाठत 1.77 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे रिझव्र्ह बँक आर्थिक वृद्धीला चालना देण्यासाठी पुढच्या महिन्यात पतधोरणाचा आढावा घेताना व्याजदरात घट करण्याच्या आशा वाढल्या आहेत.
ठोक मूल्यांक निर्देशांक आधारित महागाईचा दर सप्टेंबरमध्ये 2.38 टक्क्यांवर होता, तर मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हा दर 7.24 टक्के होता. सरकारी आकडेवारीनुसार ऑक्टोबर महिन्यात खाद्य वस्तूंच्या महागाईचा दर 2.7 टक्क्यांवर आला असून हा अडीच वर्षातील नीचांक आहे. मे महिन्यापासून खाद्यवस्तू स्वस्त होण्यास सुरुवात झाली होती. ठोक मूल्यांक निर्देशांक आधारित महागाईचा पारा सलग पाच महिन्यांपासून घसरत आहे. महागाई कमी झाल्याने पुढच्या महिन्यात पतधोरणात व्याजदर कमी होण्याची शक्यता वाटते, असे ‘फिक्की’ने म्हटले आहे. महागाईच्या दरात अपेक्षेपेक्षा अधिक घट झाली असली तरी आगामी पतधोरणात रिझव्र्ह बँक व्याजदराबाबत ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याची शक्यता दिसते, असे इक्राचे वरिष्ठ अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी म्हटले आहे. भारतीय रिझव्र्ह बँकेने महागाईला आळा घालण्यासाठी जानेवारीत पतधोरणाचा आढावा घेताना व्याजदर स्थिर ठेवले होते. 2 डिसेंबर रोजी रिझव्र्ह बँक पतधोरणाचा द्विमाही आढावा घेणार आहे.
ऑक्टोबरमध्ये कांदा, भाजीपाला, मांस, मासे आणि अंडीही स्वस्त झाल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. बटाटे मात्र महागच आहेत. साखर, खाद्यतेल, पेयपदार्थ आणि सिमेंट स्वस्त झाल्याचा दावा सरकारी आकडेवारीत करण्यात आला आहे.