Join us
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक उत्पादन घटणार

By admin | Updated: February 25, 2017 00:53 IST

जानेवारीतील कारखाना उत्पादनाची वृद्धी केवळ 0.५ टक्के राहील, असे डून अँड ब्रँडस्ट्रीट्सच्या ताज्या आर्थिक अंदाजात म्हटले आहे.

नवी दिल्ली : जानेवारीतील कारखाना उत्पादनाची वृद्धी केवळ 0.५ टक्के राहील, असे डून अँड ब्रँडस्ट्रीट्सच्या ताज्या आर्थिक अंदाजात म्हटले आहे.अहवाल म्हणतो की, सध्या भारताच्या औद्योगिक क्षेत्राला विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. घसरलेली देशांतर्गत मागणी, कमजोर आणि अनिश्चित विदेशी मागणी, वित्त पुरवठ्याच्या समस्या, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती आणि ठप्प झालेले प्रकल्प यांचा त्यात समावेश आहे. या पार्श्वभूमीवर औद्योगिक उत्पादन निर्देशांक 0.0 टक्के ते 0.0५ टक्के या दरम्यान वृद्धी दर्शविल असा आमचा अंदाज आहे.अहवालात म्हटले आहे की, दुसऱ्या बाजूने महागाई वाढण्याचा धोकाही शिरावर आहे. जागतिक बाजारातील किमती वाढत आहेत. रुपया घसरत आहे. याचा परिणाम म्हणून महागाई वाढू शकते. फेब्रुवारीत ग्राहक किंमत निर्देशांक ३.४ टक्के ते ३.६ टक्के या दरम्यान राहील. तसेच घाऊक किंमत निर्देशांक ५.५ टक्के ते ५.७ टक्के या दरम्यान राहील, असा अंदाज आहे. घाऊक क्षेत्रातील महागाई आणखी वर चढण्याची शक्यता असतानाच दुसऱ्या टप्प्यात औद्योगिक क्षेत्रातील कच्च्या मालाच्या किमती व सेवांतील वाढत्या किमतीचा परिणाम येणाऱ्या महिन्यांतील महागाईवर होणे अटळ आहे. संस्थेच्या मते विक्रमी अन्नधान्य उत्पादन आणि ग्रामीण भागातील वाढती मागणी अर्थसंकल्पातच नमूद करण्यात आली आहे. त्याचा परिणाम म्हणून इंधनाच्या मागणीवर दबाव राहील. फेब्रुवारीमध्ये रुपया ६७.१0 ते ६७.३0 प्रति डॉलर या टप्प्यात राहील. अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ केली जाण्याची शक्यता, जागतिक पातळीवर वाढत असलेल्या किमती, वर्षअखेरचे तेलाचे डॉलरमधील पेमेंट, भौगोलिक अस्थैर्य आणि रुपयाचे अतिमूल्य यामुळे रुपयावर दबाव राहील. (लोकमत न्यूज नेटवर्क)