Join us
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक उत्पादन घटले; किरकोळ महागाई मात्र वाढली

By admin | Updated: January 13, 2016 03:04 IST

औद्योगिक चक्र गतिमान होण्याच्या आशा धुळीस मिळाल्या असून नोव्हेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादनात वार्षिक आधारावर ३.२ टक्क्यांनी घट झाली.

नवी दिल्ली : औद्योगिक चक्र गतिमान होण्याच्या आशा धुळीस मिळाल्या असून नोव्हेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादनात वार्षिक आधारावर ३.२ टक्क्यांनी घट झाली. गेल्या चार वर्षांतील नीचांक आहे. कारखाना क्षेत्र आणि भांडवली वस्तूंचे उत्पादन घटल्याने औद्योगिक क्षेत्राची कामगिरी खालावली. दुसरीकडे किरकोळ क्षेत्रातील महागाई मात्र वाढली आहे. आॅक्टोबर २०११ नंतरची औद्योगिक क्षेत्राची ही अत्यंत खराब कामगिरी होय. आॅक्टोबर २०११ मध्ये औद्योगिक उत्पादन ४.७ टक्क्यांनी घटले होते. औद्योगिक उत्पादन निर्देशांकात (आयआयपी) सर्वाधिक ७५ टक्के भारांश असलेल्या कारखाना क्षेत्राचा वृद्धीदर ४.४ टक्क्यांनी घटला. मागच्या वर्षातील याच अवधीत कारखाना क्षेत्राची स्थिती अशीच होती. कारखाना क्षेत्रातील २२ उद्योगांपैैकी १७ उद्योगांची कामगिरी नोव्हेंबर २०१५ मध्ये नकारात्मक राहिली. भांडवली वस्तू क्षेत्राचे उत्पादनही नोव्हेंबर २०१५ मध्ये २४.४ टक्क्यांनी घटले असून वीजनिर्मिती क्षेत्राने शॉक दिला. या क्षेत्राचा वृद्धीदर ०.७ टक्के राहिला. खाण क्षेत्राचा वृद्धीदर मात्र २.३ टक्क्यांनी वाढला. ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादनही १.३ टक्क्यांनी वाढले. औद्योगिक क्षेत्राच्या खराब कामगिरीमुळे मागणी व पुरवठ्यातील समतोल बिघडला आहे. भांडवली वस्तू आणि न टिकणाऱ्या वस्तूंचे उत्पादन घटल्याने औद्योगिक क्षेत्राचे पुनरुज्जीवन आव्हानात्मक ठरेल, असे असोचेमचे सरचिटणीस डी. एस. रावत यांनी सांगितले. यापुढे घरगुती खर्चासाठी उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी करप्रणाली सुलभ करण्यासोबत कर प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे पीएच.डी. चेम्बर्स आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीचे अध्यक्ष महेश गुप्ता यांनी सांगितले.