Join us  

जून महिन्यामध्ये झाली औद्योगिक उत्पादनात घट; सरकारची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 1:10 AM

उत्पादन, खाण आणि वीजनिर्मितीमध्ये फटका

नवी दिल्ली : देशातील उत्पादन, खाण आणि वीज उत्पादन या प्रमुख क्षेत्रांमध्ये कमी झालेल्या उत्पादनाचा फटका अर्थव्यवस्थेला बसत असून, जून महिन्यात देशाच्या औद्योगिक उत्पादनामध्ये १६.६ टक्के एवढी घट झालेली दिसून आली.केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जून महिन्यातील देशाच्या औद्योगिक उत्पादनाबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये हे उत्पादन १६.६ टक्के एवढे कमी झाल्याचे दिसून येत आहे.जून महिन्यात देशाच्या उत्पादन क्षेत्रामध्ये १७.१ टक्के, खाणींमधील उत्पादनामध्ये १९.८ टक्के तर वीज उत्पादनामध्ये १० टक्के अशी घट नोंदविली गेल्याने जून महिना हा औद्योगिक उत्पादनाच्या दृष्टीने काहीसा अवघडच होता. याशिवाय ग्राहकोपयोगी वस्तू आणि भांडवली वस्तूंच्या क्षेत्रामध्ये अनुक्रमे ३५.५ आणि ३६.९ टक्के अशी प्रचंड घसरण झालेली दिसून आली आहे.औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक मात्र महिन्याचा विचार करता वाढलेला दिसून आला. जून महिन्यात हा निर्देशांक १०७.८ एवढा झाला. मे महिन्यामध्ये तो ८९.५ तर एप्रिल महिन्यात ५३.६ एवढा होता. मागील वर्षाच्या जून महिन्यात औद्योगिक उत्पादन १.३ टक्के वाढले होते.तिमाहीमध्ये झाली सुमारे ३६ टक्के घटएप्रिल ते जून या ३ महिन्यात देशातील औद्योगिक उत्पादनामध्ये ३५.९ टक्के एवढी मोठी घट झाली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. या तिमाहीच्या कालावधीत जवळपास पूर्णच वेळ अनेक व्यवसाय बंद राहिल्यामुळे औद्योगिक उत्पादनात मोठी घट झालेली दिसून आली. देशात लॉकडाऊन असतानाही काही अत्यावश्यक सेवा सुरू असल्याने थोड्या प्रमाणात उत्पादन सुरू राहिल्यामुळे ही घट काही प्रमाणात कमी झाली. त्याआधीच्या वर्षात याच कालावधीमध्ये औद्योगिक उत्पादनात ३ टक्के वाढ नोंदविली गेली होती.

टॅग्स :अर्थव्यवस्था