Join us

भारताची गहू आयात दशकाच्या उच्चांकावर

By admin | Updated: February 9, 2017 01:33 IST

२0१६ च्या मध्यापासून भारताने ५0 लाख टनापेक्षा जास्त गव्हाची आयात केली आहे. ही गेल्या एक दशकातील सर्वाधिक आयात ठरली आहे

नवी दिल्ली : २0१६ च्या मध्यापासून भारताने ५0 लाख टनापेक्षा जास्त गव्हाची आयात केली आहे. ही गेल्या एक दशकातील सर्वाधिक आयात ठरली आहे. सलग दोन वर्षे गव्हाच्या उत्पादनात घट झाल्यामुळे गव्हाची आयात करावी लागत असल्याचे सरकारने म्हटले आहे. या क्षेत्रातील व्यावसायिकांनी सांगितले की, एप्रिलमध्ये भारतातील गहू काढणीचा हंगाम सुरू होईल. त्या आधी आता आयात हळूहळू कमी केली जात आहे. सिंगापूर येथील एका व्यापाऱ्याने सांगितले की, देशांतर्गत हंगामात पुरवठा वाढणार असल्याने येणाऱ्या काळात दोन ते तीन लाख टनापेक्षा जास्त आयात केली जाणार नाही. उपलब्ध आकडेवारीनुसार, १ जुलैपासून २0१६ पासूनच ५१ लाख टन गव्हाची आयात भारताने केली आहे. काही व्यवसायिकांच्या मते आयातीचा हा आकडा ५२ लाख टन आहे. जानेवारीमध्ये १0 लाख टन गहू भारतात उतरविण्यात आला. फेब्रुवारीतील आयात आताच ४ लाख टनांवर गेली आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २00६-0७ या वर्षात भारताने ६७ लाख टन गहू आयात केला होता. त्यानंतर, सर्वाधिक गहू यंदा आयात करण्यात आला आहे. केंद्र सरकारशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, सलग दोन वर्षे कमी पाऊस पडल्यामुळे, तसेच अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे गेल्या वर्षीच्या मध्यास सरकारने गव्हाची आयात सुरू केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)