Join us

भारताच्या पोलाद आयातीत तब्बल ५0 टक्क्यांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2015 00:27 IST

देशात पोलादाची आयात एप्रिल २०१५ मध्ये गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत ५१.६ टक्क्यांनी वाढून ७.६ लाख टनावर पोहोचली.

नवी दिल्ली : देशात पोलादाची आयात एप्रिल २०१५ मध्ये गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत ५१.६ टक्क्यांनी वाढून ७.६ लाख टनावर पोहोचली.पोलाद मंत्रालयाच्या जॉइंट प्लान्ट कमिटीच्या (जेपीसी) अहवालानुसार, एप्रिल २०१५ मध्ये देशात ७.६१ लाख टन तयार पोलाद आयात झाले. एप्रिल २०१४ च्या तुलनेत पोलाद आयात ५१.६ टक्क्यांनी वाढली. मात्र, मार्च २०१५ च्या तुलनेत एप्रिलमधील आयात ९.४ टक्क्यांनी कमी आहे. एका पोलाद कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, घरगुती पोलाद उद्योग अडचणीच्या काळातून जात आहे. जगातील सर्वात मोठा पोलाद उत्पादक असलेल्या चीनमधील मागणी घटणे हे यामागचे प्रमुख कारण आहे. भारतात तयार करण्यापेक्षा चीनहून पोलादाची आयात स्वस्त पडते. त्यामुळे २०१४च्या दुसऱ्या तिमाहीत पोलादाची आयात झाली आहे. मात्र, ही आयात चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीपेक्षा कमी आहे, असेही हा अधिकारी म्हणाला.जेपीसीच्या आकडेवारीनुसार, २०१४-१५मध्ये पोलादाची ९३.२१ लाख टन एवढी आयात झाली. आयातीतील वाढीचे हे प्रमाण ७१ टक्के आहे. आयात वाढल्यामुळे भारताच्या चालू खात्यातील तूट वाढणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)