Join us  

पुढील वर्षात भारताचा वृद्धीदर असेल दोन अंकी, अहवालातील निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 1:26 AM

India's growth rate : सूत्रांनी सांगितले की, २०२०-२१ मध्ये अर्थव्यवस्था विक्रमी २३.९ टक्क्यांनी घसरली आहे. कोरोना विषाणूमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका बसल्यामुळे अर्थव्यवस्थेत ही घसरण झाली आहे. 

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या साथीमुळे वाईट स्थितीचा सामना करणारी भारतीय अर्थव्यवस्था २०२१-२२ या वित्त वर्षात दोन अंकी म्हणजे १० टक्के वृद्धी प्राप्त करील, असा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.‘डेलाॅईट’ने जारी केलेल्या ‘व्हाॅईस ऑफ एशिया’ या अहवालात म्हटले आहे की, भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी वाढताना दिसत आहेत. पीएमआय उत्पादन निर्देशांक २००८ नंतर उच्चांकावर आहे. सूत्रांनी सांगितले की, २०२०-२१ मध्ये अर्थव्यवस्था विक्रमी २३.९ टक्क्यांनी घसरली आहे. कोरोना विषाणूमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका बसल्यामुळे अर्थव्यवस्थेत ही घसरण झाली आहे. तथापि, आता परिस्थिती सुधारताना दिसून येत आहे. दुसऱ्या तिमाहीत घसरण कमी होऊन ७.५ टक्क्यांपर्यंत आली. मजबूत कार विक्री, स्टिलच्या उत्पादनातील वाढ आणि डीझेलच्या वापरातील वाढ यातून परिस्थिती सुधारल्याचे स्पष्टपणे दिसून येते. वस्तू व सेवा  कराच्या महसुलात मोठी वाढ झाली आहे. सणासुदीच्या हंगामाचा चांगला लाभ अर्थव्यवस्थेला झाल्याचे दिसून येत आहे.

तीन घटक महत्त्वाचे ठरणार         सुधारणा अशीच कायम राहिल्यास पुढील वर्षी म्हणजेच वित्त वर्ष २०२२ मध्ये जीडीपीचा वृद्धीदर झेप घेऊन दोन अंकी होईल. तीन प्रमुख घटक अर्थव्यवस्थेच्या वाढीला बळ देतील. समावेशी रोजगार वृद्धी, सेवा क्षेत्राचे मजबूत पुनरुज्जीवन आणि मागणीतील टिकाऊ सुधारणा हे ते तीन घटक होत. उपाययोजना आणि व्यावसायिक धोरण यांचा वृद्धीला चांगला लाभ होईल.

टॅग्स :व्यवसायअर्थव्यवस्था