Join us  

भारताचा विकासदर घसरून ४.२ टक्क्यांवर जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 5:10 AM

जीडीपीचा (सकल राष्ट्रीय उत्पन्न) दर पाच टक्के राहील, असा अंदाज स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक संशोधन विभागाच्या इकोरॅप संस्थेने आपल्या अहवालात व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात जीडीपीचा (सकल राष्ट्रीय उत्पन्न) दर पाच टक्के राहील, असा अंदाज स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक संशोधन विभागाच्या इकोरॅप संस्थेने आपल्या अहवालात व्यक्त केला आहे. त्यापुढे जाऊन या आर्थिक वर्षाच्या सप्टेंबरच्या तिमाहीअखेर हा दर ४.२ टक्क्यांवर घसरण्याची शक्यताही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.इकोरॅपच्या अहवालामध्ये म्हटले आहे की, वाहनांच्या विक्रीमध्ये झालेली घट, बांधकाम क्षेत्रात तसेच पायाभूत सुविधांमध्ये कमी झालेली गुंतवणूक तसेच विमान वाहतुकीची समाधानकारक नसलेली कामगिरी याचा हा परिणाम असू शकतो. जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, फिच तसेच मूडीज या संस्थांनीही याआधी भारताच्या विकास दराबाबत अशाच स्वरूपाचे मत व्यक्त केले आहे, हे महत्त्वाचे.जागतिक पातळीवरही अर्थव्यवस्थेत मंदी असून, त्याचा परिणाम भारतावर होत आहे, याचा उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे. या आर्थिक वर्षात जीडीपीचा दर ६.१ टक्के राहील, असे इकोरॅपने आधी म्हटले होते. पण सध्याच्या परिस्थितीमुळे हा दर ५ टक्क्यांवर जाईल, असा अंदाज स्टेट बँकेच्या या संशोधन संस्थेने व्यक्त केला आहे. एप्रिल ते जून या काळात विकास दर ५ टक्के होता. पण नंतरच्या तिमाहीत म्हणजे सप्टेंबरपर्यंत तो आणखी खाली जाईल आणि तो ४.२ टक्के इतकाच असू शकेल, असे इकोरॅपचे निरीक्षण आहे.>रेपो रेटमध्ये पुन्हा कपात?याआधी रिझर्व्ह बँकेनेदेखील आर्थिक वर्षाच्या प्रस्तावित विकास दरात कपात करून तो ६.९ वरून ६.२ टक्क्यांवर आणला. मूडीजने तर तो ५ टक्के असेल, असेच म्हटले. आर्थिक मंदीचे सावट भारतावर कायम असल्याने रेपो रेटमध्ये बँक पुन्हा कपात करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक होणार आहे. या वर्षी रिझर्व्ह बँकेने पाच वेळा रेपो रेटमध्ये कपात केली आहे.