Join us
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिक्स देशांच्या बँकेचे पहिले कर्ज भारताला शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2016 02:55 IST

ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका (ब्रिक्स) या देशांनी स्थापन केलेली द न्यू डेव्हलपमेंट बँक (एनडीबी) यावर्षीपासून कर्ज द्यायला सुरुवात करणार आहे.

शांघाय : ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका (ब्रिक्स) या देशांनी स्थापन केलेली द न्यू डेव्हलपमेंट बँक (एनडीबी) यावर्षीपासून कर्ज द्यायला सुरुवात करणार आहे. येत्या दोन महिन्यांत कर्जवाटप सुरू होऊन पहिले कर्ज भारताला सौर ऊर्जा प्रकल्पासाठी मिळू शकेल, असे बँकेचे अध्यक्ष के.व्ही. कामथ यांनी म्हटले. दोन अब्ज अमेरिकन डॉलर कर्ज द्यायचा उद्देश बँकेचा आहे. यावर्षी आम्ही दीड ते दोन अब्ज डॉलरचे कर्ज वितरित करू शकलो, तर मला आनंद वाटेल. गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही बँकेच्या उभारणीत गुंतलेलो आहोत. खूप वेगानेही आम्हाला पावले उचलायची नाहीत, असे कामथ वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले. ब्रिक्समधील प्रत्येक देशाला हरित प्रकल्पासाठी कर्ज द्यायच्या प्रक्रियेला अंतिम रूप दिले जात असून, पहिले कर्ज भारताला सौर प्रकल्पासाठी असू शकेल, असे संकेत कामथ यांनी दिले. आमच्या नजरेसमोर आहेत ते सगळे हरित प्रकल्प व तेही प्रामुख्याने सौर ऊर्जेचे. सरकारने आमच्या समोर अनेक प्रकारचे पर्याय ठेवले होते. आम्ही कर्ज देण्यासाठी जल प्रकल्पाचाही विचार करीत असून, त्यानंतर रस्ते प्रकल्प. पहिले कर्ज यावर्षी एप्रिलमध्ये दिले जाईले. एनडीबीचे पूर्ण स्वरूपातील कामकाज तिने चीनबरोबर करार करून २७ फेब्रुवारीपासून सुरू झाले.बँकेचे मुख्यालय शांघायमध्ये असेल व तिचा कारभार चीनच्या कायद्यांनुसार चालेल.——————