Join us
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या पहिल्या सहामाहीत भारताची कार निर्यात घटली

By admin | Updated: October 12, 2015 22:16 IST

श्रीलंका आणि बांगलादेशसह वेगवेगळ्या बाजारपेठांतील आव्हानांमुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारतातून कारची निर्यात काहीशी घटून २,६७,०४३ एवढी झाली.

नवी दिल्ली : श्रीलंका आणि बांगलादेशसह वेगवेगळ्या बाजारपेठांतील आव्हानांमुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारतातून कारची निर्यात काहीशी घटून २,६७,०४३ एवढी झाली. भारताने आर्थिक वर्ष २०१४-२०१५ च्या याच सहा महिन्यांत २,६८,८६३ कारची निर्यात केली होती.सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने (सियाम) दिलेल्या माहितीनुसार एप्रिल ते सप्टेंबर (२०१५-२०१६) कालावधीत कार्सची सगळ्यात मोठी निर्यातदार ह्युंदाई मोटार इंडियाची निर्यात १३.९१ टक्क्यांनी कमी होऊन ८३,५२२ कार्सची झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीने ९७,०२१ कार्सची निर्यात केली होती. यावर्षी पहिल्या सहामाहीत मारुती सुझुकी इंडियाची निर्यात ६.३४ टक्क्यांनी वाढून ६१,२०२ कार्सची झाली. गेल्या वर्षी याच सहामाहीत ही निर्यात ५७,५५२ कार्सची होती. जपानची कार निर्माती निस्सानच्या निर्यातीमध्ये ३.६४ टक्क्यांची घट होऊन ती ५३,७०४ कार्सची झाली. गेल्यावर्षी ही निर्यात या सहामाहीसाठी ५५,६३४ एवढी होती. या कालावधीत टोयोटा किर्लोस्कर मोटारची निर्यात १०.११ टक्क्यांनी वाढून ८,९६२ कार्सची झाली, फोक्सवॅगनची निर्यात १२.११ टक्क्यांनी वाढून ३६,१४५ कार्सची, तर जनरल मोटार्स इंडियाची निर्यात ३,१८० कार्सची झाली. फोर्डची निर्यात वाढून १५,१४२ कार्सची झाली.सप्टेंबरमध्ये भारतात वाहनांच्या विक्रीत तेजी दिसून आली. कार उत्पादन क्षेत्रातील मारुती सुझुकी, महिंद्रा आणि ह्युंदाई या कंपन्यांच्या विक्रीत वाढ झाली. रॉयल एनफिल्डच्या मोटारसायकल विक्रीतही मोठी वाढ झाली. व्यावसायिक वाहन क्षेत्रातील अशोक लेलँड आणि व्हीईच्या विक्रीतही वाढ झाली. मारुती सुझुकीच्या कार विक्रीत सप्टेंबरमध्ये ३.७ टक्क्यांची वाढ झाली आहे.