Join us

भारतात ९-१० टक्के वृद्धीचे सामर्थ्य -जेटली

By admin | Updated: May 5, 2015 22:40 IST

९ ते १० टक्के वार्षिक आर्थिक वाढ प्राप्त करण्याचे सामर्थ्य देशात आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.

बाकू/नवी दिल्ली : भारतातील नव्या सरकारने आपल्या एक वर्षाच्या कार्यकाळात गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुधारणा हाती घेतल्या असून ९ ते १० टक्के वार्षिक आर्थिक वाढ प्राप्त करण्याचे सामर्थ्य देशात आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. अझरबैजानची राजधानी बाकू येथे सीएनबीसी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत जेटली बोलत होते. ते म्हणाले, ‘९-१० टक्के आर्थिक वृद्धी मिळविण्याचे सामर्थ्य भारतात आहे, असे मी मानतो. याचा लाभ घेण्यासाठी आम्हाला ग्रामीण क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास आणि सिंचनावर मोठी गुंतवणूक करायची आहे. हे एक असे क्षेत्र आहे; ज्यात आम्ही प्रगती करू शकतो. पायाभूत सुविधांचा उत्पादन क्षेत्राला लाभ व्हावा यासाठी पायाभूत सुविधांतही मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची आवश्यकता आहे.’जेटली एशियाई विकास बँकेच्या वार्षिक बैठकीत सहभागी होण्यासाठी बाकू येथे आले होते. रालोआ सरकारच्या कार्यकाळाला २६ मे रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. वर्षभरात सरकारने भरपूर काम केले, असे ते म्हणाले.आपल्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात सुधारणा कार्यक्रम राबविणारे हे पहिलेच सरकार आहे, असे सांगून जेटली म्हणाले की, सरकारने गुंतवणुकीसाठी जवळपास प्रत्येक क्षेत्र खुले केले आहे. घरगुती असेल किंवा आंतरराष्ट्रीय अगदी प्रत्येक स्तरावर गुंतवणूक वाढत आहे. आम्ही सरकारी प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न करत आहोत. पायाभूत सुविधांच्या योजना वेगाने पुढे सरकत आहेत. लोक आधीसारखे त्रस्त वाटत नाहीत. भ्रष्टाचाराबाबतही कुजबूज होताना दिसत नाही.वस्तू आणि सेवाकराबाबत (जीएसटी) जेटली म्हणाले की, या मुद्यावर व्यापक सहमती आहे. मी राज्यांच्या अर्थमंत्र्यांसोबत तसेच बहुतांश राजकीय पक्षांशी चर्चा केली असून सर्वांमध्ये व्यापक सहमती आहे. जीएसटीमुळे राज्यांनाच लाभ होणार आहे, असे ते म्हणाले. पायाभूत सुविधा व सिंचनावर गुंतवणूक केल्यामुळेच नऊ ते दहा टक्के वाढ प्राप्त करता येऊ शकते. एकदा दहा वर्षांपर्यंत आपण ही वृद्धी कायम ठेवू शकलो, तर आम्ही वित्तीय तूट कमी करू शकतो आणि तेव्हाच मला समाधान वाटेल, असेही जेटली म्हणाले.