Join us

आलिशान गाड्या खरेदी करण्याकडे भारतीय ग्राहकांचा कल

By admin | Updated: January 19, 2016 03:15 IST

सरत्या वर्षात भारतीय बाजारपेठेत वाहनांच्या मागणीने नवा उच्चांक गाठल्यानंतर आता ग्राहकांच्या पसंतीचा नवा ट्रेन्ड स्पष्ट झाला असून,

मनोज गडनीस,  मुंबईसरत्या वर्षात भारतीय बाजारपेठेत वाहनांच्या मागणीने नवा उच्चांक गाठल्यानंतर आता ग्राहकांच्या पसंतीचा नवा ट्रेन्ड स्पष्ट झाला असून, छोट्या व एन्ट्री लेव्हल गाड्यांच्या तुलनेत आता पसंतीचा कल आलिशान गाड्यांकडे असल्याचे दिसून आले आहे. तर विशेष असे की, आलिशान गाड्या खरेदीचे हे प्रमाण मेट्रो शहरांसोबत द्वितीय व तृतीय श्रेणीतील शहरांतूनही जोर धरताना दिसत आहे. वाहन क्षेत्रातील शिखर संघटनेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून सेगमेंटनिहाय गाड्यांच्या विक्रीची स्थिती, ग्राहकांच्या अपेक्षा आणि या अपेक्षेनुसार वाहन कंपन्यांनी सादर केलेली नवी वाहने तसेच, ग्राहकांच्या खरेदीचा पॅटर्न अशा अनेक गोष्टी स्पष्ट होत आहेत. २०१४ आणि २०१५ या वर्षांची आकडेवारी तुलनात्मक पातळीवर तपासली असता वाहन खरेदी करताना एन्ट्री लेव्हल गाड्या घेण्याऐवजी थोड्या अधिक सुविधेसह जास्त पैसे खर्च करून चांगले किंवा उपयुक्त वाहन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे स्पष्ट होते. याकरिता २०१४ आणि २०१५ या दोन वर्षांत सेगमेंट निहाय झालेल्या वाहनांच्या विक्रीच्या अनुषंगाने सांगायचे झाल्यास, मारुती अल्टो आणि याच श्रेणीतील गाड्या या एन्ट्रिलेव्हल गाड्या म्हणून ओळखल्या जातात. २०१४ मध्ये या गाड्यांची विक्री ४,००,३८३ इतकी झाली होती तर २०१५ मध्ये हाच आकडा ३,९७,८५९ इतकी कमी झाली. तर, याच तुलनेत कॉम्पॅक्ट कार श्रेणीत म्हणजे साधारणपणे, मारुती स्विफ्ट, फोर्ड फिगो, या गाड्यांच्या विक्रीत भरीव वाढ झाली आहे.२०१४ मध्ये कॉम्पॅक्ट श्रेणीतील ९,०३, ८१४ वाहनांची विक्री झाली होती तर, २०१५ मध्ये विक्रीच्या आकड्याने दहा लाखांचा टप्पा पार केल्याचे दिसते. सुपर कॉम्पॅक्ट वाहन (होन्डा जॅझ, ह्युंडाई एलाईट आय २०), मिड साईज वाहन (फोर्ड अ‍ॅस्पायर, मारुती डिझायर, ह्युंदाई अ‍ॅसेन्ट), एक्झिक्विटीव्ह (होन्डा सिटी, ह्युंदाई वर्ना) आणि प्रीमीयम श्रेणीत टोयोटा कोरोला, ह्युंदाई सोनाटा आदी सर्व गाड्यांच्या विक्रीत वाढ झाली असल्याचा पॅटर्न जाणवतो.