Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारत यंदा चीनला मागे टाकणार

By admin | Updated: January 11, 2016 03:07 IST

विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये सलग दुसऱ्या वर्षीही भारत चांगली प्रगती करील व २०१६ मध्ये ७.७ टक्के आर्थिक प्रगतीचा वेग असेल जो चीनपेक्षा अधिक असेल

नवी दिल्ली : विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये सलग दुसऱ्या वर्षीही भारत चांगली प्रगती करील व २०१६ मध्ये ७.७ टक्के आर्थिक प्रगतीचा वेग असेल जो चीनपेक्षा अधिक असेल, असे जागतिक पातळीवरील सल्लागार कंपनी ‘पीडब्ल्यूसी’ने म्हटले आहे. कंपनीच्या अर्थशास्त्रज्ञांनी नवीन वर्षासाठीचे अंदाज जाहीर केले असून, त्यात म्हटले आहे की, जितक्या विकसनशील अर्थव्यवस्था आहेत, त्यामध्ये फक्त भारतच २०१६ वर्षात दीर्घकालीन सरासरी प्रगतीपेक्षा जास्तीचा वेग राखू शकेल. भारत, चीन, ब्राझील, रशिया, मेक्सिको, इंडोनेशिया व तुर्कस्थान या सात विकसनशील अर्थव्यवस्था असून, त्यांच्यापैकी फक्त भारताची कामगिरी चांगली राहील. ब्राझील व रशियाची अर्थव्यवस्था आकुंचित होईल, तर चीनमध्ये मंदीची शक्यता आहे, असे ‘पीडब्ल्यूसी’ने म्हटले आहे. कंपनीने म्हटले आहे की, अमेरिका, जपान, जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, इटली व कॅनडा हे जी-७ देश २०१० नंतर यंदा प्रथमच चांगली कामगिरी करतील. याउलट सात विकसनशील देशांची प्रगती कमी असेल; पण हा वेग जी-७ देशांपेक्षा मात्र जास्तच असेल. कंपनीच्या अहवालात म्हटले आहे की, भारताच्या रिझर्व्ह बँकेने गेल्यावर्षी धोरणात्मक दर आठ टक्क्यांवरून ६.७५ टक्के केल्यामुळे यंदा विक्री व गुंतवणूक दोन्हीही वाढण्याची शक्यता आहे.