नवी दिल्ली : भारत यंदा २,००० अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनणार आहे, तर देशाचा जीडीपी अर्थात सकल घरगुती उत्पादन दर २०१९ पर्यंत ३,००० अब्ज डॉलर होईल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आयएमएफच्या ताज्या जागतिक आर्थिक अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.आयएमएफच्या मते, सध्याच्या मूल्यावर डॉलरच्या दृष्टीने २०१९ पर्यंत भारत जगातील सातव्या क्रमांकाची सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होईल. सध्या भारतीय अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावर आहे.आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीनुसार, यंदा भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार २,०५० अब्ज डॉलरचा होईल. २०१३ मध्ये तो १,८८० अब्ज डॉलर होता. गेल्यावर्षीही भारताचा जगातील १० सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थात समावेश होता.अमेरिका १७,४२० अब्ज डॉलरसह जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून कायम राहील. यानंतर चीन १०,३५० अब्ज डॉलरसह दुसऱ्या क्रमांकावर राहील. दरम्यान, भारतीय अर्थव्यवस्था २०१९ पर्यंत ३,००० अब्ज डॉलरचा आकडा ओलांडून ३,१८० अब्ज डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे. रशिया, ब्राझील व इटली यांना मागे टाकत भारत जगातील सातव्या क्रमांकाची सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
भारत यंदा बनणार २ हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था
By admin | Updated: October 24, 2014 03:44 IST