कोलंबो : भारतीय रिझर्व्ह बँक आणि श्रीलंकेची केंद्रीय बँक यांच्यात १.५ अब्ज डॉलरच्या चलन देवाणघेवाणीचा करार झाला. यामुळे श्रीलंकेचे चलन स्थिर व्हायला मदत मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांच्यात शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतर या कराराची घोषणा करण्यात आली. मोदी सेशेल्स आणि मॉरिशससह तीन देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात येथे आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेचा रुपया दडपणाखाली आहे व केंद्रीय बँकेने बरेच प्रयत्न करूनही या वर्षीच्या सुरुवातीपासून श्रीलंकेच्या चलनाचा विनिमय दर कमी कमी होत गेला आहे. या पार्श्वभूमीवर या कराराला महत्त्व आहे. सध्या श्रीलंकेच्या एक रुपयाची किमत भारताचे २.१२ रुपये आहे. श्रीलंकेच्या रुपयाचा विनिमय दर २०१५ मध्ये आतापर्यंत भारतीय रुपयाच्या तुलनेत तीन टक्के घसरला आहे. १९८७ नंतर श्रीलंकेच्या दौऱ्यावर आलेले मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत.मोदी यांच्यासोबत या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पत्रकार परिषदेत या कराराचा तपशील दिला. ते म्हणाले, ‘‘यापूर्वी आमच्याकडे ४० कोटी डॉलर चलनाच्या अदलाबदलीची व्यवस्था होती. आता त्यात वाढ करून ती १.५ अब्ज डॉलर करण्यात आली आहे. गुंतवणुकीच्या मुद्यांवर चर्चा झाली. श्रीलंकन गुंतवणुकीचे भारताने जसे स्वागत केले तशी भारताने आणखी जास्त गुंतवणूक करावी, असे श्रीलंकेला वाटते.’’
भारत-श्रीलंकेत चलन देवाण-घेवाण होणार
By admin | Updated: March 13, 2015 23:45 IST