नवी दिल्ली : मावळत्या वर्षात जगभर आर्थिक उलथापालथी होत असताना भारत मात्र ‘चमकदार तारा’ ठरला, असा दावा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला. आगामी वर्षात जीएसटीला मंजुरी मिळविणे आणि उद्योग सुलभतेवर भर देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.येथे एका मुलाखतीत ते बोलत होते. ते म्हणाले की, देशात अर्थव्यवस्थेच्या हालचाली वाढत नसल्याचे काही जण बोलतात. ही बाब म्हणजे येथील जीवनशैली असून तो एक प्रकारचा ‘निराशावाद’ आहे.२०१५ या मावळत्या वर्षाचा आढावा घेताना ते म्हणाले की, जागतिक मंदी आणि प्रतिकूल परिस्थिती असतानाही भारताचा वृद्धीदर ७ ते ७.५ टक्के राहण्याची शक्यता आहे. ही बाब पाहता जगभरात भारत एक चमकणारे स्थान राहिले आहे. जागतिक परिस्थिती पाहता भारताचा वृद्धीदर चांगला असून त्यात आगामी महिन्यात आणखी सुधारणा अपेक्षित आहे. जगभरात असलेल्या मंदीच्या आव्हानावर भारतातून चांगली प्रतिक्रिया आली आहे.काही क्षेत्रात आम्हाला वेगाने काम करावे लागेल, अशी कबुली देऊन त्यांनी मावळत्या वर्षातील कामगिरीवर समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, देशाचा वित्तीय पाया ‘फार मजबूत’ आहे.नवीन वर्षात सरकारसमोर असलेल्या महत्त्वाच्या कामांचा उल्लेख करताना ते म्हणाले की, पायाभूत सुधारणांना पुढे चालूच ठेवले जाईल आणि वस्तू आणि सेवाकर (जीएसटी), प्रत्यक्ष कर यांना तर्कसंगत करणे, उद्योग सुलभता यावर आपला भर राहील. हे काम झाल्यानंतर भौतिक पायाभूत सुविधा, सामाजिक स्तरावरील सुधारणांसाठी जास्तीत जास्त तरतूद आणि सिंचनासाठीही जास्त निधी याकडे लक्ष दिले जाईल. या क्षेत्राकडे बरेच दुर्लक्ष करण्यात आले.
मावळत्या वर्षात भारतच ‘चमकदार तारा’ -जेटली
By admin | Updated: December 28, 2015 00:34 IST