Join us

‘भारताला आर्थिक घडी नीटनेटकी करण्याची संधी’

By admin | Updated: January 8, 2015 23:50 IST

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या भावात होत असलेल्या घसरणीमुळे भारताला आर्थिक घडी नीटनेटकी करण्याची संधी आहे.

वॉशिंग्टन : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या भावात होत असलेल्या घसरणीमुळे भारताला आर्थिक घडी नीटनेटकी करण्याची संधी आहे. तेलावरील सबसिडी कमी करण्यासह आवश्यक आर्थिक सुधारणांना चालना देण्यासाठी या संधीचा भारताने फायदा घ्यावा, असे मत जागतिक बँकेचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांनी व्यक्त केले आहे.आर्थिक सुधारणांमुळे भारताला पुन्हा उच्च वृद्धीदर गाठता येऊ शकतो, तसेच भविष्यातील संभाव्य जागतिक आर्थिक संकटाच्या मुकाबल्याचीही तयारी करता येऊ शकते. कच्च्या तेलाच्या भावातील घसरणीचा विविध देशांवर वेगवेगळे परिणाम होऊ शकतात; परंतु भारताच्या दृष्टीने मात्र ही आर्थिक घडी निटनेटकी करण्यासाठी संधी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.कौशिक बसू हे जागतिक बँकेत येण्याआधी मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार होते. कच्चे तेल स्वस्त झाल्याचा भारत जरूर फायदा घेईल. २००८ मध्येही कच्च्या तेलाचे भाव घसरले होते; परंतु सहा महिन्यांतच पुन्हा भाव चढले होते. यावेळी मात्र किमान वर्षभर तरी घसरणीचा कल कायम राहील. आर्थिक सुधारणा आणि वृद्धीला चालना देण्यासाठी भारताने या संधीचा फायदा घ्यावा.भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास ५ टक्के दराने होत आहे. तो कमी नाही; तथापि, अधिक गतीने वृद्धी साध्य करता येऊ शकते. तेलावरील सबसिडी कमी केल्यास देशांतर्गत भाव लागलीच वाढणार नाहीत. तेलाचे भाव चढे असताना सबसिडी कमी केल्यास तेलाचे भावही एकदम उसळतात. सबसिडी करण्यासाठी आज मोठी संधी आहे. भाव किंचित वाढतील किंवा वाढणारही नाहीत. कारण जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव अत्यंत खाली घसरलेले आहेत.चौकट....कच्च्या तेलाच्या घसरणीचा विकसनशील देशांना निश्चित फायदा होईल; परंतु तेल निर्यातदार देशांपुढे मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.