Join us  

निवडणुकांपूर्वी ६ ते ११ रुपयांपर्यंत कमी होऊ शकतात पेट्रोलचे दर; 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 12:04 PM

आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत लवकरच कपात केली जाण्याची शक्यता आहे.

आगामी लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे, विद्यमान सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांना खुश करण्याचा प्रयत्न होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण झाले. त्यानंतर, मोदींनी देशभरातील नागरिकांसाठी सोलर ऊर्जाशी संबंधित सूर्योदय योजनेची घोषणा केली आहे. त्यातच, आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत लवकरच कपात केली जाण्याची शक्यता आहे. एक अहवालानुसार, कच्च्या तेलाच्या किंमती उतरल्याने भारतीय ऑईल कंपनींना फायदा होत आहे. त्यामुळे, इंधन दरकपात केली जाऊ शकते. 

ICRA लिमिटेडचे समुहप्रमुख गिरीश कुमार कदम यांनी म्हटले की, आयसीआरएच्या अंदाजानुसार आंतरराष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत ओएमसीला पेट्रोलवर ११ रुपये आणि डिझेलवर ६ रुपये प्रति लिटरचा अधिक लाभ मिळत आहे. सप्टेंबर २०२३ मोठ्या कपातीनंतर काही महिन्यातच, पेट्रोलच्या व्यापार मार्जिनमध्ये सुधारणा झाली. तर, ऑक्टोबर नंतर डिझेलच्या मार्जिनमध्ये सुधारणा दिसून आली, असे गिरीश कुमार कदम यांनी सांगितले. बिझनेस टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

आयसीआरएला वाटत की, या वाढलेल्या मार्जिनमुळे सध्या इंधनकपात शक्य आहे. जर कच्च्या तेलाचे दर असेच स्थीर राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात होऊ शकते. ६ रुपये ११ रुपये प्रति लिटरपर्यंत ही दरकपात केली जाऊ शकते. दरम्यान, यापूर्वी मे २०२२ मध्ये इंधनच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली होती. त्यावेळीही, काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सरकारने ही दरकपात केल्याचा आरोप विरोधकांनी केंद्र सरकारवर केला होता. 

८० डॉलर प्रति बॅरेल

सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत ८० डॉलर प्रति बॅरेलपेक्षा कमी आहे. लिबिया आणि नार्वे येथील वाढीव उत्पादनासह मागणी घटल्याने पश्चिम आशियात व्यापक संघर्ष होण्याची कुठलाही शक्यता नाही. 

सध्याचे इंधन दर

सध्या राजधानी दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ९६.७२ एवढे आहे. तर, डिझेल ८९.६२ रुपयांवर आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचे दर १०६.३१ रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर ९४.२७ रुपये प्रतिलिटर आहेत. 

टॅग्स :पेट्रोलतेल शुद्धिकरण प्रकल्पडिझेलनिवडणूकलोकसभा