Join us
Daily Top 2Weekly Top 5

निर्देशांकाने गाठला पाच सप्ताहातील उच्चांक

By admin | Updated: May 25, 2015 01:07 IST

जागतिक शेअर बाजारांमध्ये असलेले समाधानकारक वातावरण, मिनीमम अर्ल्टनेटिव्ह टॅक्स (मॅट) बाबत योग्य विचार करण्याचे सरकारचे आश्वासन

जागतिक शेअर बाजारांमध्ये असलेले समाधानकारक वातावरण, मिनीमम अर्ल्टनेटिव्ह टॅक्स (मॅट) बाबत योग्य विचार करण्याचे सरकारचे आश्वासन, मान्सूनची योग्य प्रकारे सुरू असलेली वाटचाल आणि रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा यामुळे गत सप्ताह तेजीचा राहिला. बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यवहार झाले. परकीय वित्त संस्थांकडून मोठ्या प्रमाणात खरेदीही झाली. परिणामी बाजाराच्या निर्देशांकाने पाच सप्ताहांतील उच्चांक प्रस्थापित केला.मुंबई शेअर बाजारामध्ये गत सप्ताह साधारणत: तेजीचा राहिला. सप्ताहातील दोन दिवसांचा अपवाद वगळता निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक २८०७१.१६ अशा उंचीवर पोहोचला होता. त्यानंतर त्यामध्ये काहीशी घट होऊन तो २७९५७.५० अंश असा पाच सप्ताहांतील उच्चांकावर बंद झाला. मागील बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये ६३३.५० अंश म्हणजेच २.३१ टक्के वाढ झाली आहे.राष्ट्रीय शेअर बाजारातही तेजीचा माहोल दिसून आला. येथील निर्देशांक (निफ्टी) ८५०० अंशांच्या निकट पोहोचला होता. मात्र, सप्ताहाच्या अखेरीस तो ८४५८.९५ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहापेक्षा त्यामध्ये १९६.६० अंश म्हणजेच २.३८ टक्के एवढी वाढ झाली. गेल्या तीन सप्ताहांमध्ये या निर्देशांकात २७७.४५ अंश म्हणजेच ३.३९ टक्के वाढ झाली आहे. बाजारात मोठ्या प्रमाणावर खरेदी होत असल्याने जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये तेजीचे वातावरण दिसून आले. स्मॉल कॅप आणि मिडकॅप या क्षेत्रीय निर्देशांकामध्ये अनुक्रमे ०.५३ आणि १.५१ टक्के वाढ झालेली दिसून आली. बाजाराचे १२ क्षेत्रीय निर्देशांक आहेत त्यापैकी ११ निर्देशांक मागील सप्ताहात वाढीव पातळीवर बंद झालेले दिसून आले.परकीय वित्त संस्थांना मॅटची आकारणी करण्यावरून सरकार आणि वित्त संस्थांमध्ये सुरूअसलेला वाद मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.