Join us

निर्देशांकाने गाठला आठ महिन्यांचा उच्चांक

By admin | Updated: January 29, 2017 23:27 IST

आगामी अर्थसंकल्पामध्ये गुंतवणूकदारांसाठी लाभदायक घोषणा असण्याची बाजाराची अपेक्षा, आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक वातावरण

शेअर समालोचन - प्रसाद गो. जोशीआगामी अर्थसंकल्पामध्ये गुंतवणूकदारांसाठी लाभदायक घोषणा असण्याची बाजाराची अपेक्षा, आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक वातावरण, डेरिव्हेटिव्हजची वाढीव सौदापूर्ती अशा वातावरणामुळे विविध आस्थापनांच्या निराशाजनक निकालांकडे बाजाराने दुर्लक्ष करीत चढती कमान गाठली. सप्ताहामध्ये निर्देशांकांनी आठ महिन्यांमधील उच्चांकी धडक मारलेली दिसून आली. मुंबई शेअर बाजारामध्ये सध्या तेजीचे वारे वाहत आहेत.

आगामी अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री गुंतवणुकीला प्रोत्साहन देतील, अशी अपेक्षा असल्याने अर्थसंकल्पपूर्व तेजी बघावयास मिळाली. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सप्ताहामध्ये ८४७.९६ अंशांनी वाढून २७८८२.४६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) २९१ अंश वाढून ८६४१ अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या निर्देशांकांसह सर्वच क्षेत्रीय निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झाले.

डेरिव्हेटिव्हज व्यवहारांच्या सौदापूर्तीमध्ये पाच महिन्यांमधील झालेला उच्चांक आणि परकीय वित्तसंस्थांचे भारतीय बाजारात पुन्हा सक्रीय होणे या बाबीही तेजीला आणखी हातभार लावणाऱ्या ठरल्या. गतसप्ताहामध्ये परकीय वित्तसंस्थांनी १३०० कोटी रुपयांची खरेदी केली. आंतरराष्ट्रीय बाजारांतील सकारात्मक वातावरणाचाही प्रभाव भारतीय बाजारावर पडला. अमेरिकेच्या डो जोन्स निर्देशांकाने प्रथमच २० हजार अंशांचा टप्पा पार केला. यामुळे युरोपमध्येही तेजीचे वारे वाहत आहेत. त्यामुळेही भारतीय बाजारातील तेजी वाढलेली दिसून आली.