प्रसाद गो. जोशीआंतरराष्ट्रीय शेअर बाजारांमध्ये असलेले निराशेचे वातावरण, उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीमुळे निर्माण झालेले तणावाचे वातावरण अशा निराशाजनक वातावरणातही देशात पावसाची सुरू असलेली दमदार वाटचाल आणि लागू झालेल्या जीएसटीची सहज सुलभ होत असलेली अंमलबजावणी यामुळे बाजारात उत्साह निर्माण झाला. बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने नवा उच्चांकही गाठला.मुंबई शेअर बाजारात गत सप्ताहामध्ये तेजीचे वारे वाहताना दिसून आले. सप्ताहाच्या प्रारंभी बाजार वाढीव पातळीवर सुरू झाला. संवेदनशील निर्देशांकाने ३१४६०.७० अंशांचा नवीन उच्चांक केला. त्यानंतर काहीसा खाली येऊन हा निर्देशांक ३१३६०.६३ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये ४३९.०२ अंश म्हणजेच १.४२ टक्कयांनी वाढ झाली आहे. गेल्या तीन सप्ताहापासूनची साप्ताहिक घसरण यामुळे थांबली आहे. जीएसटीची सुरळीत अंमलबजावणी आणि पावसाची दमदार वाटचाल यामुळे बाजारात उत्साह होता.राष्ट्रीय शेअर बाजारातही तेजीचा माहोल होता. येथील निर्देशांक (निफ्टी) १४४.९० अंशांनी (१.५२ टक्के) वाढून ९६६६.८० अंशांवर बंद झाला. बाजारात खरेदीदारांची गर्दी असल्याचे चित्र होते. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्येही वाढ झालेली दिसून आली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभाग वगळता अन्य जवळपास सर्वच क्षेत्रांना मागणी असलेली दिसून आली.अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह संचालक मंडळाच्या बैठकीत चलनवाढ व अन्य मुद्यांवर एकमत न झाल्याने कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. परिणामी तेथील व्याजदरवाढीचा मुद्दा अनिर्णित राहिला आहे. अन्य महत्वाच्या मध्यवर्ती बॅँकांनीही आपापल्या देशांच्या अर्थव्यवस्थांबाबत केलेल्या काळजीच्या घोषणांमुळे तेथेही समभागांना फारसा उठाव नव्हता. उत्तर कोरियाने केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीमुळे कोरियन विभागातील राजकीय तणाव वाढला आहे.
निर्देशांकाने केला आणखी एक उच्चांक
By admin | Updated: July 10, 2017 00:09 IST