गडगडलेल्या शेअर बाजारामध्ये सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये विविध घटनांमुळे चांगली खरेदी झाल्यामुळे संवेदनशील निर्देशांक २८ हजार अंशांचा टप्पा ओलांडून बंद झाला आणि गुंतवणूकदारांना हायसे वाटले. जीएसटीच्या मुद्यावर सरकारने स्वीकारलेली मवाळ भूमिका आणि सार्वजनिक क्षेत्रातील बॅँकांना वाढीव भांडवल देण्याची तयारी यामुळे बाजारात जान आली. मुंबई शेअर बाजारात गतसप्ताह संमिश्र राहिला. सप्ताहाच्या पूर्वार्धामध्ये बाजारात घसरण दिसून आली पण त्यानंतर उत्तरार्धात मात्र मोठ्या प्रमाणावर खरेदीदार लाभल्याने बाजार तेजीत आला आणि सप्ताहाअखेर निर्देशांक २८ हजारांच्या पार गेला.सप्ताहाच्या अखेरीस संवेदनशील निर्देशांक २८११४.५६ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहापेक्षा त्यामध्ये अवघी २.२५ अंश वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ११.३० अंश म्हणजेच ०.१३ टक्कयांनी वाढून ८५३२.८५ अंशांवर बंदझाला.शेअर बाजारामध्ये काळा पैसा येऊ नये यासाठी पी नोटस्वर कडक निर्बंध लादण्याचा केंद्र सरकारचा निर्धार व्यक्त झाल्याने बाजारात चिंतेचे वातावरण होते. त्यातच चीनमधील उत्पादन क्षेत्रामध्ये घट होत असल्याने जगभरातील शेअर बाजार मंदीत होते. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीत व्याजदर तूर्त कायम ठेवण्याचा निर्णय झाल्यानंतर भारतीय शेअर बाजारामध्ये परकीय संस्था कार्यरत झाल्या. खाली आलेल्या बाजाराचा फायदा घेत या संस्थांनी मोठी खरेदी केली.गत सप्ताहामध्ये फ्युचर आणि आॅप्शन व्यवहारांच्या जुलै महिन्याची सौदापूर्ती होती. या सौदापूर्तीसाडी मोठ्या प्रमाणावर झालेल्या खरेदीनेही बाजाराला चालना मिळाली. सप्ताहाच्या पूर्वार्धामध्ये बाजारात झालेली घट भरून निघण्याला त्यामुळे हातभार लागला.जीएसटी विधेयकामध्ये काही सुधारणा करण्यास सरकारने दाखविलेली तयारी आणि त्यामुळे कोंडी फुटण्याची निर्माण झालेली शक्यताही बाजाराला काही प्रमाणात हातभार लावणारी होती. याच जोडीला केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील काही बॅँकांना आणखी भांडवल पुरविण्याचा निर्णय जाहीर केल्याने बाजार वधारला आणि अखेरीस निर्देशांकाने २८ हजारांचा टप्पा पुन्हा एकदा ओलांडला.
-प्रसाद गो. जोशी