Join us
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या आठवड्यात वाढ; मात्र अस्थिरतेबाबत भीती

By admin | Updated: January 5, 2016 00:18 IST

सरत्या वर्षात बाजार खाली आला असला तरी नवीन वर्षाचा प्रारंभ बाजाराने किरकोळ वाढीने केल्याने गुंतवणूकदारांना मानसिक समाधान लाभले.

सरत्या वर्षात बाजार खाली आला असला तरी नवीन वर्षाचा प्रारंभ बाजाराने किरकोळ वाढीने केल्याने गुंतवणूकदारांना मानसिक समाधान लाभले. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक २६ हजारांच्या पुढे गेल्याने तेजीचे वातावरण आहे. मात्र सोमवारी झालेल्या गडगडीमुळे २०१५ प्रमाणे आता २०१६ मध्येही शेअर बाजारातील अस्थिरता कायम राहते का, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये सांशकता व्यक्त होत आहे.मुंबई शेअर बाजारात गत सप्ताहात तेजीचा माहोल राहिला. बाजारात चार दिवस तेजी राहिली मात्र वर्षाच्या अखेरीस निर्देशांक काहीसा खाली आला. सप्ताहाच्या अखेरीस मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक २६,१५0.८0 अंशावर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये ३१२.१९ अंशांनी वाढ झाली. गेल्या तीन सप्ताहात निर्देशांकामध्ये १११६ अंशांची वाढ झाली आहे.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १0२.१५ अंशांनी म्हणजे १.३0 टक्क्यांनी वाढून ७,९६३.२0 अंशांवर बंद झाला. बाजारात खरेदीसाठी गर्दी दिसून आली. सप्ताहाचा प्रारंभ फ्युचर आणि आॅप्शन व्यवहारांच्या सौदापूर्तीने झाला. बाजाराने या सौदापूर्तीला चांगला प्रतिसाद दिला. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर कमी होत असल्याने त्याचा भारतासह अन्य देशांना लाभ होत आहे. परिणामी अर्थव्यवस्थेच्या वाढीला हातभार लागण्याची चिन्हे दिसू लागल्याने बाजारात तेजी आली आहे. सप्ताहात जगातील अनेक शेअर बाजार ख्रिसमसमुळे बंद होते. आगामी सप्ताहात हे शेअर बाजार तसेच अन्य बाबी कोणती दिशा दाखवितात याकडे बाजाराचे लक्ष लागलेले आहे.देशातील ८ पायाभूत उद्योगांमधील नोव्हेंबर महिन्यातील कामगिरी पुन्हा एकदा निराशाजनकच राहिल्याचे दिसून आले. या उद्योगांमधील उत्पादन १.३ टक्क्यांनी कमी झाले. ग्राहकांची मागणी कमी होत असल्याने या उद्योगांना हा फटका बसला. चीनमधील औद्योगिक उत्पादनात सलग पाचव्या महिन्यात घट झाल्याने जगभरातील शेअर बाजारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.