Join us

सेन्सेक्समध्ये भरघोस वाढ

By admin | Updated: June 22, 2015 23:38 IST

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने सलग सातव्या दिवशी वाढ नोंदवली असून, सोमवारी तर ४१४ अंकाची भर घालत २७.७३०.२१ पर्यंत मजल मारली आहे.

मुंबई : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने सलग सातव्या दिवशी वाढ नोंदवली असून, सोमवारी तर ४१४ अंकाची भर घालत २७.७३०.२१ पर्यंत मजल मारली आहे. मान्सून चांगला होण्याचे संकेत मिळत असल्याने रियल्टी, बँका व आॅटो कंपन्यांचे शेअर्स नफ्यात गेले व त्यामुळे निर्देशांकात चांगलीच वाढ नोंदवली गेली. गेल्या सात दिवसांत सेन्सेक्स १,३५९.२३ अंकाने वाढला असून , हा फेब्रुवारीनंतरचा पहिला विजयी रन आहे. दरम्यान, निफ्टी निर्देशांकही ८,३०० च्या पातळीवर पुन्हा गेला आहे. ग्रीसने आपल्या कर्जदारांना नवी आश्वासने देऊन कर्जातून मुक्त होण्यासाठी नवे पर्याय सुचविले आहेत, त्यामुळे ग्रीस कर्जबाजारी होण्याची शक्यता मावळली असून नवे आशादायक वातावरण तयार झाले आहे. अंदाज केल्यापेक्षाही चांगला पाऊस हे आजच्या सकारात्मकतेचे मुख्य कारण आहे. मान्सूनचा प्रभाव असाच कायम राहिला तर रिझर्व्ह बँक पुन्हा दरकपात करेल अशी शक्यता निर्माण झाली असून, त्यामुळेही बाजार उत्साहात आहे, असे रिलायन्स सिक्युरिटीजचे प्रमुख संशोधक हितेश अग्रवाल यांनी म्हटले आहे. जूनमध्ये पाऊस सर्वसाधारण होईल असे हवामान खात्याने म्हटलेआहे. ३० शेअरचा मुंबई निर्देशांक सोमवारी सकाळीच चढता होता आणि दिवसभर त्याची वाढ सकारात्मक राहिली. दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्स २७.७८२.३१ पर्यंत चढला; पण दिवसअखेरीस २७,७३०.२१ अंकावर बंद झाला. ही वाढ ४१४.०४ अंकाची असून, १.५२ टक्के आहे. ८ मे नंतर एका दिवसात झालेली ही सर्वोच्च वाढ आहे.(वृत्तसंस्था)८ मे रोजी सेन्सेक्स ५०६.२८ अंकाने वाढला होता. ५० शेअर्सचा निफ्टी निर्देशांक दिवसभरात ८,३६९.४५ अंकापर्यंत चढला; पण दिवसअखेर ८,३५३.१० अंकावर बंद झाला. ही १२८.१५ अंकाची, तसेच १.५६ टक्के वाढ आहे. अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक यांचे शेअर्स आज अनुक्रमे ३.६२ व ३.४६ टक्के वाढले. सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता असल्याने उत्साहाचे वातावरण आहे, रिझर्व्ह बँक दरकपात करेल अशी नवी आशा गुंतवणूकदारांना वाटत आहे. यामुळे निर्देशांक वाढला असून, बँकांच्या शेअर्सनी या वाढीत प्रमुख भूमिका निभावली आहे. जागतिक पातळीवर अशियान मार्केट वाढले, तर युरोपियन मार्केटमध्येसुद्धा दुपारनंतर वाढीचे वातावरण राहिले.