Join us

व्याजदर कपातीने बाजारात वाढ

By admin | Updated: January 19, 2015 02:17 IST

संक्रांतीच्या मुहूर्तावर भारतीय रिझर्व्ह बॅँकेने केलेली रेपो दरातील कपात, आगामी काळात व्याजदरामध्ये कपात होण्याच्या अपेक्षेने झालेली मोठी खरेदी, चलनवाढीतील काहीशा वाढीचा अपवाद

प्रसाद गो. जोशी - संक्रांतीच्या मुहूर्तावर भारतीय रिझर्व्ह बॅँकेने केलेली रेपो दरातील कपात, आगामी काळात व्याजदरामध्ये कपात होण्याच्या अपेक्षेने झालेली मोठी खरेदी, चलनवाढीतील काहीशा वाढीचा अपवाद वगळता अर्थव्यवस्थेच्या वाढीला हातभार लावणाऱ्या घटना यामुळे मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराने सप्ताहामध्ये चांगली वाढ दाखवून दिली. बाजारातील सर्वच निर्देशांक वाढले.गतसप्ताह हा बाजाराला उत्साह देणारा ठरला. संवेदनशील निर्देशांक २८ हजारांची तर निफ्टी निर्देशांक ८५०० अंशांची पातळी ओलांडून बंद झाल्याने गुंतवणुकदारांमध्ये उत्साह आहे.मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक गतसप्ताहामध्ये ६६३ अंशांनी वाढून २८१२१.८९ अंशांवर बंद झाला. वाढलेल्या निर्देशांकामुळे बाजारात उत्साह निर्माण झालेला दिसत होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ८५०० अंशांची पातळी ओलांडून बंद झाला. सप्ताहामध्ये हा निर्देशांक २.७७ टक्के म्हणजेच २२९.३० अंशांनी वाढून ८५१३.८० अंशांवर बंद झाला. मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारांमधील व्यवहारांमध्ये सुमारे आठ हजार कोटी रुपयांनी वाढ झाली. भारतीय अर्थव्यवस्थेवरील चलनवाढीचा दबाव बराच कमी झाल्याने भारतीय रिझर्व्ह बॅँकेने अचानक रेपो दरामध्ये पाव टक्का कपात करून बाजाराला धक्काच दिला.अचानक झालेल्या या कपातीमुळे आगामी काळात बॅँकांच्या व्याजदरामध्ये कपात होण्याची अपेक्षा वाढली आहे. मे २०१३नंतर प्रथमच रिझर्व्ह बॅँकेने रेपो दरामध्ये कपात केल्याने लवकरच कर्ज स्वस्त होण्याची शक्यता वाढीला लागल्याने बॅँका तसेच स्थावर मालमत्तेच्या आस्थापनांच्या समभागांना मागणी वाढली आणि तियांच्या भावामध्ये वाढ झाली.गतसप्ताहातच जाहीर झालेल्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाची आकडेवारीही बाजाराला आणखी उभारी देणारी ठरली. नोव्हेंबर महिन्यात हा निर्देशांक ३.८ टक्कयांवर पोहोचला असून गेल्या पाच महिन्यातील उच्चांक त्याने गाठला आहे.