Join us

जागतिक बाजारातील तेजीमुळे सोन्या-चांदीच्या भावात वाढ

By admin | Updated: January 22, 2016 03:09 IST

जागतिक बाजारपेठेने दिलेले सकारात्मक संकेत व ज्वेलर्सकडून होणाऱ्या खरेदीतील वाढ यामुळे गुरुवारी सोने २१० रुपयांनी वाढले

नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेने दिलेले सकारात्मक संकेत व ज्वेलर्सकडून होणाऱ्या खरेदीतील वाढ यामुळे गुरुवारी सोने २१० रुपयांनी वाढले. येथील बाजारात प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव २६ हजार ९०० रुपये होता. चांदीचा भावही वाढ नोंदवत प्रति किलो ३४ हजार ६५० रुपये झाला. जागतिक पातळीवर शेअर बाजारातील मंदीमुळे लोकांचा कल सोने खरेदीकडे वाढला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्याचा परिणाम देशी बाजारपेठेत जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक बाजापेठेत सोने प्रति औंस ११०० डॉलर झाले, तर सिंगापूर बाजारात सोने ०.३ ने वधारून ११०४.०२ डॉलरवर गेले. व्यापाऱ्यांनी सांगितले की, लग्नसराई तोंडावर असल्यामुळे सराफांकडून सोन्याची खरेदी वाढली आहे. त्याचाही परिणाम भाव वाढण्यावर झाला. दिल्ली बाजारात प्रति दहा ग्रॅमला ९९.९ शुद्ध सोने २६ हजार ९००, तर ९९.५ शुद्ध सोने २६ हजार ७५० रुपये होते. बुधवारी सोने ३४० रुपयांनी वाढले, तर आज २१० रुपयांनी महागले. शुद्ध सोनेही १०० रुपयांनी वधारून प्रति ८ ग्रॅमला २२ हजार ५०० रुपये झाले.