Join us

वाहन क्षेत्राला मिळणाऱ्या सवलतींना मुदतवाढ ?

By admin | Updated: September 12, 2014 00:43 IST

वाहन क्षेत्राला दिली जाणारी उत्पादन शुल्कातील सवलतीची मुदत वाढविण्याचा सरकारचा विचार असून, त्यामुळे वाहन उद्योगाला मोठा दिलासा मिळेल

नवी दिल्ली : वाहन क्षेत्राला दिली जाणारी उत्पादन शुल्कातील सवलतीची मुदत वाढविण्याचा सरकारचा विचार असून, त्यामुळे वाहन उद्योगाला मोठा दिलासा मिळेल.अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी ‘एक्मा’च्या परिषदेदरम्यान पत्रकारांना सांगितले की, वाहन उद्योग क्षेत्राला दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनात्मक सवलती पुढेही चालू ठेवण्याच्या प्रस्तावावर विचार करण्यात आला आहे. योग्य वेळी सरकार यासंदर्भात निर्णय घेईल.अवजड उद्योग मंत्रालय उत्पादन शुल्क सवलतीची मुदत ३१ मार्च २०१५ पर्यंत वाढविण्यासंबंधीचा प्रस्ताव वित्त मंत्रालयाला देणार असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. वाहन कंपन्या आणि टिकाऊ ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रासाठी जूनमध्ये उत्पादन शुल्क सवलतीची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली होती. त्याआधी ही सवलत ३० जूनपर्यंत होती. सरकारने फेब्रुवारीमध्ये अंतरिम अर्थसंकल्प मांडताना कार, एसयूव्ही तसेच दुचाकीशिवाय टिकाऊ ग्राहकोपयोगी वस्तूंवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. छोट्या कार, स्कूटर, मोटारसायकलवरील उत्पादन शुल्क १२ टक्क्यांवरून ८ टक्के करण्यात आले होते. एसयूव्ही उत्पादन शुल्क ३० टक्क्यांवरून २४ टक्के करण्यात आले होते. तसेच मोठ्या कारवरील शुल्क २७ टक्क्यांवरून २४ टक्के करण्यात आले होते. तसेच मध्यम आकाराच्या कारवरील उत्पादन शुल्क २४ वरून २० टक्के करण्यात आले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)