मुंबई : प्रत्यक्ष कर म्हणजे काय, कर कसा आकारला जातो, मुळात कर का आकारला जातो, या आणि अशा अनेक करविषयक घटकांचे शिक्षण आता शालेय पातळीवर मिळणार असून, विद्यार्थ्यांना हे शिक्षण थेट प्राप्तिकर अधिकाऱ्यांकडूनच देण्यात येणार आहे. वरकरणी क्लिष्ट भासणाऱ्या पण अर्थव्यवस्थेतील महत्वपूर्ण अशा कर या विषयासंदर्भात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानेच पुढाकार घेत स्वत:च्या पातळीवर विद्यार्थ्यांकरिता एक बेसिक अभ्यासक्रम केला असून, प्राप्तिकर खात्याचे अधिकारी विद्यार्थ्यांना ही माहिती देतील. हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करून घेण्यात येणार नाही, अथवा याची कोणतीही परिक्षाही होणार नाही. परंतु, अर्थव्यवस्थेतील अत्यंत महत्वाच्या घटकाची माहिती देण्याकरिता हा उपक्रम असल्याची माहिती प्राप्तिकर खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.प्राप्तिकर खात्याचे देशभरातील विविध विभागाचे मुख्य आयुक्त आणि आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येणार असून सहायक आयुक्त, उपायुक्त, सह आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, आयुक्त अशा अधिकाऱ्यांतर्फे हे प्रशिक्षण देण्यात येईल. सध्याच्या नियोजनानुसार प्रत्येक तिमाहीतील विशिष्ट दिवशी शाळांत जाऊन हे प्रशिक्षणवर्ग घ्यावे लागतील. (प्रतिनिधी)
प्राप्तिकर अधिकारीही म्हणताहेत... स्कूल चले हम !
By admin | Updated: June 16, 2015 02:51 IST