Join us

आयकर विभाग- करदात्यांत ई-मेल व्यवहारांना विलंब

By admin | Updated: December 13, 2015 22:55 IST

आयकर विभागाकडून करदात्यांशी कागदांचा वापर न करता पत्रव्यवहार ई-मेलद्वारेच करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेला विलंब होत आहे.

नवी दिल्ली : आयकर विभागाकडून करदात्यांशी कागदांचा वापर न करता पत्रव्यवहार ई-मेलद्वारेच करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेला विलंब होत आहे. या योजनेसाठी आवश्यक असलेली माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला (सीबीडीटी) अनेक अधिकाऱ्यांनी दिलेली नसल्यामुळे हा उशीर होत आहे.सीबीडीटीने गेल्या आॅक्टोबरमध्ये या योजनेला प्रायोगित तत्त्वावर सुरुवात करण्यासाठी दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू व चेन्नई या मंडळांची निवड केली होती. या मंडळातील १०० करदात्यांची प्रकरणे त्यासाठी निवडून त्यांच्याशी ई-मेलद्वारे पत्रव्यवहार केला जाणार होता.वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार चेन्नई विभाग वगळता इतर विभागांनी या योजनेसाठी पाच निवडक ‘नॉन कॉर्पोरेट रेंज’ पाठविली नाही. याची त्यांना आठवण करून देण्यात आली आहे. सीबीडीटी आणि अर्थ मंत्रालयासाठी ही योजना खूप महत्त्वाची आहे. ती यशस्वी ठरली तर प्रशासनात ती आमूलाग्र बदल घडवील, त्याचबरोबर करदात्यांच्या तक्रारीही कमी करण्यात मोठी भूमिका बजावील. करदाते आणि कर अधिकारी यांच्यामधील पत्रव्यवहार हा ई-मेलद्वारे व्हावा असे अधिसूचित करण्यात आले होते.