भुवनेश्वर : ओडिशा राज्यातील बालेश्वर जिल्ह्यात तरंगा येथे मंगळवारी केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते राष्ट्रीय भूगर्भविज्ञान उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तेल आणि नैसर्गिक वायूसारखेच भूगर्भातील हायड्रोकार्बन वायूचा साठा शोधण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ओडिशातील महानदीच्या खोऱ्यातून याची सुरुवात करण्यात आली आहे.या उपक्रमांतर्गत आॅइल अँड नॅच्युरल गॅस कॉर्पोरेशन अर्थात, ओएनजीसी, तसेच आॅइल इंडिया लिमिटेड देशभरात सर्व्हे करणार आहे. ओएनजीसी १८ राज्यांत गाळापासून तयार झालेल्या २६ खोऱ्यांतील जवळपास ४० हजार किलोमीटर लाइनवर सर्व्हे करणार असून, आॅइल इंडिया आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मिझोरम आणि नागालँड राज्यांमध्ये जवळपास सात हजार किलोमीटर लाइनवर सर्व्हे करणार आहे. या सर्व्हेमुळे भूगर्भातील तेलपद्धतीचा सखोल अभ्यास होणार आहे, तसेच ओडिशातील हायड्रोकार्बनच्या साठ्याचा शोध लागल्यानंतर राज्यातील गुंतवणुकीचा ओघ वाढेल, अशी आशा पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केली. महानदी खोऱ्यातील सर्व्हेसाठी तब्बल ७९.५७ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
हायड्रोकार्बनसाठीच्या सर्व्हेचे प्रधान यांच्या हस्ते उद्घाटन
By admin | Updated: October 13, 2016 07:09 IST