Join us

सोन्या-चांदीच्या भावात झाली अखेर सुधारणा

By admin | Updated: April 11, 2015 01:17 IST

सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सोने-चांदीच्या भावात सुधारणा नोंदली गेली.

नवी दिल्ली : सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सोने-चांदीच्या भावात सुधारणा नोंदली गेली. सोन्याचा भाव ५० रुपयांच्या किरकोळ सुधारणेसह २६,८०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक सराफ्यात ही वाढ नोंदली गेली आहे.चांदीचा भावही १०० रुपयांनी वाढून ३६,७५० रुपये प्रतिकिलो राहिला. औद्योगिक संस्था व नाणे निर्मात्यांची मागणी वधारल्याने ही वाढ झाल्याचे दिसून आले. व्यापाऱ्यांनी सांगितले की, सध्याच्या पातळीवर आभूषण निर्माते व किरकोळ विक्रेत्यांनी खरेदीचा जोर वाढविल्याने बाजारात तेजी नोंदली गेली. जागतिक बाजारात तेजीचा कल राहिल्याने स्थानिक बाजार धारणेस चालना मिळाली. लंडन येथे सोन्याचा भाव ०.८५ टक्क्यांनी वधारून १,२०३.७० डॉलर प्रतिऔंस राहिला. राजधानी दिल्ली येथील सराफ्यात ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ५० रुपयांनी वाढून अनुक्रमे २६,८०० रुपये व २६,६५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तथापि, आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २३,७०० रुपये या अगोदरच्या पातळीवर कायम राहिला. तयार चांदीचा भाव १०० रुपयांनी वाढून ३६,७०० रुपये प्रतिकिलोवर गेला. दुसरीकडे मर्यादित मागणीमुळे चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ५० रुपयांनी घटून ३६,४०० रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ५५,००० रुपये व विक्रीकरिता ५६,००० रुपये प्रतिशेकड्यावरकायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)