Join us

शालेय शिक्षणाचा दर्जा आणखी वाढविणार

By admin | Updated: August 25, 2014 23:48 IST

औरंगाबाद : अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी शासन विविध योजना राबवीत आहे. भविष्यात आणखी नव्या योजना आणल्या जाणार आहेत. शालेय शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी शासन कटिबद्ध असून, त्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सोमवारी केले.

औरंगाबाद : अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी शासन विविध योजना राबवीत आहे. भविष्यात आणखी नव्या योजना आणल्या जाणार आहेत. शालेय शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी शासन कटिबद्ध असून, त्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सोमवारी केले.
उर्दू माध्यमातून दहावी - बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा लोकमत समाचारतर्फे आयोजित कार्यक्रमात शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते लोकमत भवन येथे सत्कार करण्यात आला. या समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राजेंद्र दर्डा बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शहागंज येथील बडी मशिदीचे इमाम मौलाना मुजीबुल्लाह, लोकमत समाचारचे कार्यकारी संपादक अमिताभ श्रीवास्तव, औरंगाबाद टाइम्सचे संपादक शोएब खुसरो, उर्दू वर्तमानपत्र रोजनामा एशिया एक्स्प्रेसचे संपादक शारीक नक्षबंदी, माजी उपमहापौर नरेंद्र पाटील, नगरसेवक जहांगीर खान उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा म्हणाले की, शाळांमधील इंग्रजी विषयात विद्यार्थी मागे पडतात, ही बाब लक्षात घेऊन ब्रिटिश कौन्सिल यांच्याकडून शिक्षकांना इंग्रजीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. अशाच प्रकारे कनिष्ठ महाविद्यालयात भौतिकशास्त्र विषय विद्यार्थ्यांना डोक्यावरून जातो. त्यावर उपाय करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. त्यांच्याकडून भौतिकशास्त्र शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देऊन हा विषय विद्यार्थ्यांना सोपा करून कसा शिकवावा, याविषयी धडे देण्यात येत आहेत. पालकांनीही आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे. हे करताना मात्र, त्याने केवळ डॉक्टर अथवा इंजिनिअर व्हावे, असा विचार न करता त्यांच्यातील सुप्त गुणांचाही विचार करावा.
ते म्हणाले, आपल्याला मिळालेल्या प्रत्येक संधीतून शहराचा विकास केला आहे. पर्यटनमंत्री असताना जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास केला, तर ऊर्जामंत्री झाल्यावर शहरात ड्रमसारखे प्रकल्प राबवून शहरवासीयांना अखंड वीज उपलब्ध केली. सातारा येथील भारत बटालियनच्या माध्यमातून शहराला सुरक्षा कवच प्रदान केले. उद्योगमंत्री असताना येथे डीएमआयसी प्रकल्प आणला. त्यामुळे तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. हजयात्रेसाठी चिकलठाणा विमानतळ ते जेद्दाह, अशी थेट विमानसेवा सुरू केली. शिवाय लवकरच हज हाऊस आणि पासपोर्ट कार्यालयाची सेवाही सुरू केली जाईल.
याप्रसंगी मौलाना मुजीबुल्लाह यांनी मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व विशद केले. उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून लोकमत समाचारने आयोजित केलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. शिवाय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी केलेली विकासकामे अतुलनीय असल्याचे सांगितले.