Join us  

डिस्प्ले पॅनलवर आयात कर लावल्यामुळे फोन महागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2020 6:21 AM

केंद्राचा निर्णय : ५ टक्क्यांपर्यंत किमती वाढणार

नवी दिल्ली : डिस्प्ले आणि टच पॅनलवर १० टक्के आयात कर लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यामुळे सॅमसंग, अ‍ॅपल, विवो, शिओमी, ओप्पो आणि रिअलमी या कंपन्यांचे स्मार्ट फोन तसेच फीचर फोन महागणार आहेत.सूत्रांनी सांगितले की, आत्मनिर्भर भारत अभियानास गती देण्यासाठी डिस्प्ले पॅनलवर आयात कर लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आयात महागल्यास ही उत्पादने देशातच तयार करण्याकडे उत्पादकांचा कल वाढेल. एक टक्का अतिरिक्त अधिभारामुळे प्रत्यक्ष आयात कर ११ टक्के लागणार आहे. आयात कर लावल्यामुळे सरकारला अतिरिक्त महसूलही मिळेल.

मोबाइल फोन उत्पादक कंपन्यांशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, नव्या करामुळे फोनच्या किमती १.५ टक्के ते ५ टक्के यादरम्यान वाढतील. ऐन सणासुदीच्या हंगामात फोनच्या किमती वाढल्यास विक्रीवर परिणाम होईल, अशी भीती कंपन्यांना वाटत आहे. कोविड-१९ महामारीमुळे लोकांच्या हातात आधीच पैसे नाहीत. सूत्रांनी सांगितले की, डिस्प्ले आणि टच पॅनल हा मोबाइलच्या उत्पादनातील सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहे. फोनच्या एकूण उत्पादन खर्चात त्याचा वाटा १५ ते २५ टक्के आहे. डिस्प्ले पॅनलवर आयात कर लादण्याची हीच योग्य वेळ आहे, असे सरकारला वाटते.सूत्रांनी सांगितले की, वास्तविक गेल्या वर्षी एप्रिलमध्येच हा कर लावण्यात येणार होता. तथापि, ही उपकरणे भारतातच तयार करण्यासाठी कंपन्यांना वेळ मिळावा म्हणून सरकारने हा निर्णय दोन वेळा पुढे ढकलला होता. याघडीला सुमारे चार कंपन्या भारतात डिस्प्ले पॅनल बनवीत आहेत. होलीटेक आणि टीसीएल या कंपन्यांचा त्यात समावेश आहे. 

टॅग्स :व्यवसायमोबाइल