Join us

चालू वित्त वर्षात २२.३७ लाख टन डाळींची आयात

By admin | Updated: December 1, 2015 02:15 IST

भारताने चालू आर्थिक वर्षात सप्टेंबरपर्यंत १६१.२ कोटी डॉलरची २२.३७ लाख टन डाळीची आयात केली. ही माहिती सोमवारी संसदेत देण्यात आली. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत सर्वाधिक

नवी दिल्ली : भारताने चालू आर्थिक वर्षात सप्टेंबरपर्यंत १६१.२ कोटी डॉलरची २२.३७ लाख टन डाळीची आयात केली. ही माहिती सोमवारी संसदेत देण्यात आली. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत सर्वाधिक डाळीची आयात कॅनडाहून ९.३० लाख टन व नंतर म्यानमारमधून ५.५२ लाख टन आणि आॅस्ट्रेलियातून २.२३ लाख टन डाळ आयात करण्यात आली. वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन लेखी उत्तरात म्हणाल्या की, आर्थिक वर्ष २०१४-२०१५ मध्ये ४५.८४ लाख टन डाळींची आयात झाली होती. यावर्षी डाळीचे भाव २१० रुपये किलोपर्यंत गेले. देशात २०१४-२०१५ वर्षात २० टनांनी डाळींचे उत्पादन घटल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. कमी पावसामुळे डाळीच्या उत्पादनात १४ टक्के घट झाली. पीक वर्ष २०१४-२०१५ दरम्यान देशात डाळीचे उत्पादन १.७२ कोटी टन होते. ते २.५ कोटी टनांच्या मागणीच्या तुलनेत खूपच कमी आहे. हे अंतर आयातीद्वारे भरून काढले जात आहे. दोन वर्षांच्या अंतरानंतर सरकारला यंदा डाळींची आयात करावी लागली. याआधी खासगी क्षेत्रातून ही आयात व्हायची.५५ लाख टन तांदूळ निर्यातभारताने विद्यमान आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत ३.१७ अब्ज डॉलर किमतीच्या ५५.२६ लाख टन तांदळाची निर्यात केली. एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान देशातून १.९१ अब्ज डॉलर किमतीचा २०.८४ लाख टन बासमती तांदूळ निर्यात झाला. याच दरम्यान १.२५ अब्ज डॉलरपेक्षा जास्त किमतीच्या अन्य जातीच्या तांदळाची निर्यात ३४.४२ लाख टनांची होती.लोकसभेत वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लेखी उत्तरात म्हटले आहे की, आर्थिक वर्ष २०१४-२०१५ मध्ये ७.८ अब्ज डॉलर किमतीच्या १.९१ कोटी टन तांदळाची निर्यात करण्यात आली. सगळ्यात जास्त तांदूळ सौदी अरेबियाला ५.९८ लाख टन निर्यात केला गेला. सेनेगलला ५.०८ व संयुक्त अरब अमिरातीला ४.१५ लाख टन तांदळाची निर्यात झाली. भारतीय खाद्य महामंडळाच्या परवानगीने तांदळाची आयात होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)